मुंबई गुन्हे शाखेतील आणि सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करत अाभासी अटक केल्याचे सांगत सायबर गुन्हेगारांनी एका ज्येष्ठ नागरिकास ४९ लाखांचा ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. गुन्हेगारांनी न्यायालयाचे कामकाज सुरू असल्याचा देखावा करत पीएमएलए अंतर्गत या ज्येष्ठावर कारवाई करण्यास सीबीआयला आदेश दिल्याचे भासवले. याप्रकरणी कोपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कोपरी परिसरात राहणारे ६२ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक पाटबंधारे विभागातून निवृत्त झाले आहेत. त्यांना विजय जसवंत याने फोन करून तो ट्रायमधून बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्या आधारकार्डचा गैरवापर करत सिमकार्ड घेत बँकेत खाते उघडले असल्याची बतावणी केली. संबंधित बँक खाते एका व्यक्तीने पाच लाखांना विकत घेतले असून त्या बदल्यात दहा टक्के रक्कम तुम्हाला दिल्याचे समोर आले आहे. या व्यक्तीने केलेल्या ५३८ कोटींच्या घोटाळ्यात तुमच्या कुटुंबाचा सहभाग असल्याचे जसवंतने त्यांना सांगितले. नंतर ज्येष्ठाचा फोन मुंबई गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांशी जोडून देतो, असे सांगितले. त्यानंतर पीएमएमलए न्यायालयात ऑनलाइन सुनावणी घेतली. ज्येष्ठाच्या बाजूने त्यांना दिलेल्या वकिलाने न्यायालयात बाजू मांडल्याचे दाखवण्यात आले. जोपर्यंत निर्दोषत्व सिद्ध होत नाही तोपर्यंत सीबीआयला सहकार्य करण्याचे निर्देश न्यायालयाने ज्येष्ठास देत सीबीआय आणि गुन्हे शाखेने सात दिवसांत अहवाल देण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याचे भासवण्यात आले होते. त्यानंतर गुन्हेगारांनी ज्येष्ठास घरातून बाहेर मोबाइल घेऊन जाण्यास मज्जाव केला. त्यांना घराबाहेर जायचे असल्यास परवानगी घेण्याची अट घालत या ज्येष्ठाकडून सुरुवातीला दहा लाख रुपये उकळले. नंतर पुन्हा ऑनलाइनच्या माध्यमातून २० लाख रुपये घेतले. अशाप्रकारे ज्येष्ठाकडून तीस लाख उकळल्यानंतर सीबीआय अधिकारी अशी बतावणी करणाऱ्या गुन्हेगाराने आणखी १८ लाखांची तजवीज करण्याविषयी सांगितले. या ज्येष्ठ नागरिकाला समोरून परवानगी दिल्यानंतरत घरातून बाहेर जाता येत होते. त्यामुळे ते चार दिवस घरातून बाहेर पडलेच नव्हते.


