शहरात व शहराबाहेर विविध एलपीजी ऑटोगॅस सेंटरवर असलेल्या विविध दरामुळे रिक्षा चालकांला फटका बसत आहे. एलपीजीचा पुरवठा नियमित करावा, तसेच एलपीजीचे दर एकसारखे करावे. यासह अन्य मागण्यांसाठी विविध रिक्षा चालक संघटनांच्या हाकेवरून सोमवारी क्रांतीचौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर रिक्षा चालकांनी मोर्चा काढण्यात आला. मोर्चात रिक्षा चालक कमी होते. मात्र शहरात साठ टक्क्यांवर रिक्षांची वाहतूक बंद ठेवून रिक्षा चालकांनी आंदोलनाला समर्थन जाहीर केले. जिल्हाधिकाऱ्यांनी एलपीजीच्या दराबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
शहरातील एलपीजी इंधनाचे वाढते दर आणि एलपीजी घेण्यासाठी तासन तास रांगा लावून इंधन खरेदी करावे लागत असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाराष्ट्र वाहतूक सेनेसह शहरातील भीम सेना रिक्षा संघटना. मराठवाडा रिक्षा युनियन, छावा संघटना रिक्षा युनियन, वायएफ रिक्षा युनियन, भीम शक्ती रिक्षा चालक संघटना, झुंजार छावा रिक्षा युनियन, रोशन ऑटो रिक्षा युनियनसह कल्याणकारी रिक्षा युनियनतर्फे सोमवारी रिक्षा चालकाच्याविविध मागण्यांसाठी आंदोलन झाले. क्रांतीचौकातून दुपारी वाजेच्यादरम्यान रिक्षा चालकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला. आंदोलनाचे नेतृत्व सलीम खामगावकर, सरवर खान, वसीम सिद्दीकी, मोहम्मद मोहसीन (सर) यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केले.
मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्याशी भेटण्यासाठी रिक्षा चालक संघटनांचे पदाधिकारी गेले. शहरातील विविध भागात असलेल्या ऑटो गॅस सेंटरवर समान दर करावेत, अशी मागणी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी पुरवठा विभागाला ऑटो गॅस सेंटरच्या एजन्सींना नोटीस बजाविण्याचे आदेश दिले. तसेच पुरवठा विभागालाही दराबाबत योग्य निर्णय जाहीर करण्याबाबत आदेश बजाविले. अन्य मागण्यांबाबत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.






