‘कधी काळी याचकाच्या भूमिकेत असलेला भारत देश, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात आता ‘ आत्मनिर्भर भारत ’ म्हणून जगाच्या पाठीवर स्वाभिमानाने उभा असलेला पाहावयास मिळत आहे. एखाद्या देशाचा अभिमान जागृत करून एक मोठे परिवर्तन कसे घडवले जाऊ शकते, ते मोदी यांनी दाखवून दिले. त्यांनी देशाचा भक्कम पाया रचला असून, यापुढे सातत्याने त्यावर मजले चढवत आपण पुढेच जाणार आहोत’, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी काढले.
मोदी सरकारच्या तपपूर्तीनिमित्त रवींद्र नाट्य मंदिर येथे ‘राष्ट्रनिर्माणाची तपपूर्ती’ या विशेष संग्राह्य अंकाचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. पंतप्रधान मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्याच्या घटनेला मंगळवारी एक तप पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या विशेषांकात मोदी यांच्या नेतृत्वाखालील देशाचा विकासप्रवास, महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय आणि विविध क्षेत्रांतील कामगिरीचा सविस्तर लेखाजोखा मांडण्यात आला आहे. ‘अर्थव्यवस्था म्हणून भारताने केलेली प्रगती थक्क करणारी आहे’, असे प्रतिपादन फडणवीस यांनी यावेळी केले. ‘नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची शपथ घेऊन उद्या १२ वर्षे पूर्ण होतील. या कालावधीत गरीबांना घर, शौचालय उपलब्ध करून देणे, असा गरीबकेंद्रित कारभार झाला. त्यामुळे १० वर्षांमध्ये भारताने २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढल्याबद्दल संयुक्त राष्ट्राने आपल्या अहवालात कौतुक केले’, असेही ते म्हणाले.
‘‘आम्ही नवीन संधी निर्माण करणार नाही, देशाचा विकास किंवा पायाभूत सुविधांवर कोणताही खर्च करणार नाही’, अशी यूपीएच्या सरकारची मानसिकता होती. त्यातून निर्माण झालेल्या अर्थव्यवस्थेच्या ताणामुळे आपण संधी निर्माण करू शकलो नाही. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी अशी अर्थव्यवस्था तयार केली, ज्यातून गुंतवणुकीच्या माध्यमातून संधी तयार होतील. अर्थव्यवस्था विस्तारून देशाच्या तिजोरीत पैसा येईल व गरिबी दूर होईल’, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी मोदी यांची कार्यपद्धती विषद केली. तर,‘पंतप्रधान मोदी यांनी देशाला वेगळी दिशा कशी देता येईल, जगासमोर भारत देश सर्वश्रेष्ठ म्हणून नावारूपाला कसा येईल, या दृष्टिकोनातून जे करता येऊ शकते ते ते करण्याचा प्रयत्न केला’, असे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यावेळी नमूद केले.





