मुंबईचा पारा ३५ अंशांंपार

महाराष्ट्र टाइम्स

मुंबईत उकाडा वाढणार आहे. बुधवारपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांसाठी 'यलो ॲलर्ट' जारी करण्यात आला आहे. तापमान ३५ अंशांपार जाण्याची शक्यता आहे. आर्द्रतेमुळे अस्वस्थता वाढली आहे. काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. मान्सूनपूर्व सरींची प्रतीक्षा कायम राहील.

मुंबईचा पारा ३५ अंशांंपार
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

असह्य उकाड्यामुळे मुंबईकर हैराण झालेले असतानाच या उकाड्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उद्या, बुधवारपर्यंत मुंबई तसेच ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट वातावरणासाठी ‘यलो ॲलर्ट’ देण्यात आला आहे. सोमवारी मुंबईमध्ये कुलाबा आणि सांताक्रूझ या दोन्ही केंद्रांवर ३५ अंशांहून अधिक कमाल तापमान नोंदले गेले. तर, प्रत्यक्ष जाणीव मात्र ४० अंशांहून अधिक होती. किमान तापमानाचा पाराही आर्द्रतेमुळे चढा असल्याने अस्वस्थताही अधिक होती.

सांताक्रूझ येथे ३५.१, तर कुलाबा येथे ३५.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची सोमवारी नोंद झाली. अलिबाग येथे ३६, तर डहाणू येथे ३६.७ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. मंगळवारी आणि बुधवारीही कमाल तापमानाचा पारा चढाच राहू शकतो. बुधवारी दुपारनंतर किंवा संध्याकाळी तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर २८ मे ते ३१ मे या कालावधीत मुंबईत आभाळ निरभ्र राहू शकते. त्यामुळे मुंबईमध्ये मान्सूनपूर्व सरींची प्रतीक्षा कायम राहील असा अंदाज आहे. मुंबईमध्ये आर्द्रता वाढलेली आहे. मात्र या आर्द्रतेचे रूपांतर पावसाच्या सरींमध्ये झालेले नाही. आर्द्रतेमुळे उष्णता निर्देशांकात वाढ झाली असून, हा निर्देशांक ४० ते ५० अंशांदरम्यान असल्याची भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार नोंद झाली आहे.

मुंबईसह रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातही बुधवारपर्यंत उष्ण आणि दमट वातावरणाची शक्यता आहे. रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये मंगळवार आणि बुधवारी दुपारनंतर हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर कोकणातील तीनही जिल्ह्यांना उष्ण आणि दमट वातावरणासाठी ‘यलो ॲलर्ट’ देण्यात आला आहे, तर दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरीला मंगळवार आणि बुधवारसाठी मेघगर्जनेसह पावसासाठी ‘यलो ॲलर्ट’ देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही बुधवारी आणि गुरुवारी मेघगर्जनेसह पावसासाठी ‘यलो ॲलर्ट’ जारी करण्यात आला आहे.