नवी मुंबईतील नेरूळ परिसरात पाणथळ ठिकाणच्या रोहित पक्ष्यांच्या (फ्लेमिंगो) अधिवासात ड्रोन कॅमेरा वापरण्यास कांदळवन कक्षाने बंदी घातली आहे. या पक्ष्यांच्या सुरक्षेसाठी या भागात सुरक्षारक्षक नेमण्यात आले असून, आणखी ही नियम जाहीर करण्यात आले आहेत.
राज्य सरकारच्या वन विभागाचा कांदळवन कक्ष, मुंबई, कांदळवन विभाग, उत्तर कोकण यांच्या वतीने या संदर्भातील फलक एनआरआय येथील पाणथळ जागी लावण्यात आले आहेत.
ड्रोन कॅमेरामुळे पक्ष्यांच्या अधिवासास, प्रजननास व नैसर्गिक हालचालींना गंभीर धोका निर्माण होतो. ड्रोनच्या आवाजामुळे त्यांना त्रास होऊ शकतो, त्यांचे लक्ष विचलित होऊ शकते. शिवाय पक्ष्यांचे थवे ड्रोन कॅमेराला धडकून अपघाताचीही शक्यता आहे. त्यामुळे या भागात ड्रोन कॅमेरा वापरास बंदी घालण्यात आली आहे. शिवाय पक्ष्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाण्यात जाण्यासही मनाई करण्यात आली आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना रोहित पक्ष्यांपासून सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






