मेट्रोची पेंटोग्राफ तपासणी ‘एआय’द्वारे

महाराष्ट्र टाइम्स

मुंबई मेट्रो आता अधिक सुरक्षित झाली आहे. एमएमआरडीएने स्वयंचलित पेंटोग्राफ तपासणी प्रणाली सुरू केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि लेझर स्कॅनिंगमुळे ही तपासणी काही सेकंदात होते. यामुळे वेळेची बचत होते आणि देखभाल कार्यक्षमतेत वाढ होते. मेट्रोच्या नियमित फेऱ्यांदरम्यानच ही तपासणी केली जाते. यामुळे तांत्रिक बिघाड टाळता येतात.

मेट्रोची पेंटोग्राफ तपासणी ‘एआय’द्वारे
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

मेट्रोचे संचालन अधिक सुरक्षित, स्मार्ट आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने एमएमआरडीएने निर्णायक पाऊल टाकले आहे. देशातील पहिली स्वयंचलित ‘ पेंटोग्राफ स्थिती निरीक्षण प्रणाली’ (एपीसीएमएस) महामुंबई मेट्रोमध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), मशीन लर्निंग, हायस्पीड लेझर स्कॅनिंग आणि थ्रीडी इमेजिंगच्या मदतीने ही प्रणाली धावत्या ट्रेनमधील पॅन्टोग्राफची रिअल-टाइम तपासणी करणार आहे. यामुळे सुमारे ३० मिनिटे लागणारी तपासणी आता काही सेकंदांत पूर्ण होईल. देखभाल कार्यक्षमतेत ९० ते ९५ टक्के वाढ होणार आहे.

मेट्रो ट्रेन आणि ओव्हरहेड वीजपुरवठा प्रणाली यांना जोडणारा पेंटोग्राफ हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. त्यामधील कार्बन स्ट्रिपची झीज, तडे, अलाइनमेंटमधील दोष किंवा संरचनात्मक बिघाड वेळीच लक्षात आला नाही, तर मोठे तांत्रिक अडथळे निर्माण होऊ शकतात. आतापर्यंत या घटकांची तपासणी नियोजित देखभाल कालावधीत मानवी पद्धतीने केली जात होती. यासाठी वेळ आणि मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात खर्च होत होते. नव्या ‘एपीसीएमएस’ प्रणालीमुळे संपूर्ण प्रक्रिया आता स्वयंचलित झाली आहे.

मेट्रोच्या नियमित फेऱ्यांदरम्यानच, वेग कमी न करता किंवा सेवा विस्कळीत न करता ही तपासणी केली जाणार आहे. हाय-स्पीड लेझर स्कॅनर, प्रिसिजन इमेजिंग आणि थ्रीडी ट्रायँग्युलेशन तंत्रज्ञानाद्वारे पेंटोग्राफची सूक्ष्म माहिती संकलित केली जाते. त्यानंतर एआय-आधारित प्रणाली संभाव्य दोष, झीज किंवा तांत्रिक बदल यांचे विश्लेषण करून प्रारंभिक टप्प्यातच धोक्याची सूचना दिली जाते.

ही प्रणाली कार्बन स्ट्रिपमधील तडे, चिप्स, असामान्य झीज, कार्बनची जाडी तसेच हॉर्न्स आणि पेंटोग्राफ असेंब्लीतील इतर घटकांची स्थिती तपासते. याशिवाय यॉ, रोल आणि पिच अँगल्सचे निरीक्षण करून अलाइनमेंटमधील त्रुटी शोधल्या जातात. तसेच अपलिफ्ट फोर्स आणि ओव्हरहेड विद्युत प्रणालीशी असलेला संपर्कही तपासण्यात येतो.