नालेसफाई कामावर नाराजी व्यक्त करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांनी नालेसफाई कामाच्या पाहणी दौऱ्याकडे मात्र सोमवारी पाठ फिरवली. स्थायी समिती सदस्यांसाठी पूर्व उपनगरातील मिठी नदी, रेल्वे कल्वर्ट आणि नाल्यांमधील स्वच्छतेच्या कामाचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ‘स्थायी’च्या २६ सदस्यांपैकी केवळ सात सदस्यच हजर होते. धक्कादायक म्हणजे, या सदस्यांसमोरही सफाई कामगारांना हातमोजे आणि गमबूटांविना नाल्यात उतरवल्याचे दिसून आले.
नालेसफाईच्या पाहणी दौऱ्याला स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, महापालिकेचे सभागृह नेते गणेश खणकर, काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी, प्रीती सातम, दीपमाला बढे, जमीर कुरेशी, मीनाक्षी पाटणकर हे सदस्य उपस्थित होते. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त, प्रमुख अभियंताही दौऱ्याला उपस्थित होते.
पूर्व उपनगरातील कुर्ला (पूर्व) येथील मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे कल्वर्ट, वांद्रे कुर्ला संकुल कनेक्टर येथील मिठी नदी, शेल वसाहत मार्गावरील टिळकनगर-चेंबूर रेल्वे स्थानक कल्वर्ट, गोवंडी व चेंबूर रेल्वे स्थानक येथील सुभाषनगर नाला, मानखुर्द व गोवंडी रेल्वे स्थानकादरम्यानचा डेमोग्राफिक नाला, मानखुर्द व गोवंडी रेल्वे स्थानकादरम्यानचा टेलिकॉम नाला आणि मानखुर्द व गोवंडी रेल्वे स्थानकादरम्यानचा मानखुर्द नाला आदींची स्थायी समिती सदस्यांनी पाहणी केली. तसेच, आवश्यक ते निर्देश दिले.
यावेळी स्थायी समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, या अपेक्षेने ‘बेस्ट’ची एसी बस सोबत होती. मात्र २६ पैकी केवळ सात सदस्य उपस्थित राहिले. प्रचंड उकाडा पाहता सदस्यांनी स्वतःच्याच वाहनांनी प्रवास करण्यास पसंती दिली.
‘मिठी नदी तसेच मोठ्या व लहान नाल्यांमधील गाळ काढण्याची कामे युद्धपातळीवर हाती घेऊन ती निर्धारित मुदतीत पूर्ण करावीत. त्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी अतिरिक्त यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाची नियुक्ती करावी. पावसाचे पाणी लोकवस्तीत घुसू नये यासाठी सखल भागांमध्ये नाल्यांना संरक्षक सीमाभिंती उभाराव्यात. नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह अखंड आणि सुरळीत राहील, प्रवाह अरुंद होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. नाल्यांच्या वहन क्षमतेस अडथळा निर्माण करणाऱ्या उपयोगिता वाहिन्यांचे तातडीने स्थलांतर करावे,’ असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले.
हातमोजे, गमबुटांविना सफाई
गोवंडी व चेंबूर रेल्वे स्थानक (एम पश्चिम विभाग) येथील सुभाषनगर नाल्यामध्ये काही प्रमाणात कचरा आणि गाळ साचल्याचे निदर्शनास आले. मानखुर्द नाल्यातही मोठ्या प्रमाणात कचरा, गाळ साचल्याचे आढळले. यावेळी नालेसफाईसाठी उतरलेल्या कामगारांना सुरक्षिततेसाठी हातमोजे, गमबूट कंत्राटदाराकडून देण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले. ही गंभीर बाब असतानाही त्याकडे महापालिकेने मात्र सपशेल दुर्लक्ष केले आहे.





