शीव प्रतीक्षानगर आगारातील पार्किंगमध्ये रविवारी मध्यरात्री बेस्टच्या दोन बसगाड्यांना भीषण आग लागली. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, दोन्ही बस जळून खाक झाल्या.
बसगाड्या रविवारी रात्री १०.२१ वाजता प्रतीक्षानगर आगाराच्या पार्किंगमध्ये उभ्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास आगारातील सुरक्षारक्षक बिन नवाज यांनी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बसमधून धूर आणि आगीच्या ज्वाळा निघताना पाहिले. या बसच्या आगीची झळ बाजूला उभ्या असलेल्या आणखी एका बसला लागल्याचे समजते. अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्री १२.३० वाजता आग पूर्णपणे आटोक्यात आणली.






