छत्रपती संभाजीनगर : भेटण्यासाठी बोलावून घेऊन जीवे मारण्याच्या उद्देशाने एकाच्या मानेवर चाकूने वार केल्याची घटना रविवारी महावीर चौक परिसरात घडली. त्यात एक जण जखमी गंभीर झाला.
या प्रकरणी खंडू भीमराव म्हस्के (वय ३९, रा. म्हस्के गल्ली , गणपती मंदिराशेजारी, पडेगाव) यांनी तक्रार दिली. रविवारी त्यांचे काका अंबादास आसाराम म्हस्के (वय ५५) यांना राम शेषराव बोडखे यांचा फोन आला. वारंवार फोन करून बोडखे अंबादास म्हस्के यांना म्हणाले, की तू शिरसाटच्या जवळचा आहेस. तुझ्यात हिंमत असेल, तर आता बाबा पेट्रोल पंपाजवळ भेटायला ये. तिथे गेल्यावर बोडखे याने अंबादास म्हस्के यांना ‘आता तुझा मर्डर करतो,’ असे म्हणून चाकू काढून त्यांच्या मानेवर वार केले. त्यात ते जखमी झाले.
त्यानंतर पोलिसांनी राम बोडखेचा शोध सुरू केला. एका खासगी रुग्णालयात तो उपचार घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.






