शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आग्रही भूमिकेमुळे महायुतीत विधान परिषद निवडणुकीतील जागावाटपाचा प्रश्न अद्याप निकाली निघालेला नाही. छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुणे या मतदारसंघांवरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. या तीन जागांवर मित्र पक्षांशी चर्चा सुरू असल्याची माहिती देतानाच, ‘आम्ही एकत्र बसून चर्चेतून मार्ग काढू’, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केला.
विधान परिषदेच्या १७ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली तरी महायुतीचे जागावाटप अद्याप निश्चित झालेले नाही. भाजपने शिवसेनेला तीन, तर राष्ट्रवादीला दोन जागा देऊ केल्या आहेत. मात्र, सेनेने सात आणि राष्ट्रवादीने पुण्याच्या जागेसाठी आग्रह धरला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना फडणवीस यांनी महायुतीच्या रखडलेल्या जागावाटपासंदर्भात भाष्य केले.
‘जागावाटपाबाबत मित्रपक्षांशी चर्चा सुरू आहे. शिवसेनेशी विधान परिषदेच्या नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर, तर राष्ट्रवादीसोबत पुण्याच्या जागेबाबत चर्चा केली जात आहे. अजून मार्ग निघालेला नाही. मात्र, आम्ही तिघेही एकत्र बसून मार्ग काढू. या चर्चेतून नक्कीच मार्ग निघेल असा मला विश्वास आहे’, असेही त्यांनी नमूद केले.
‘आंबेनळीची दुर्घटना दुर्देवी’
‘आंबेनळी घाटात गाडी दरीत कोसळून झालेली दुर्घटना अतिशय दुर्देवी आहे. यासंबंधी पहिल्यांदा कुणालाही माहिती नव्हती. पण, हे बेपत्ता असल्याचे लक्षात आल्यानंतर शोध घेण्यास सुरूवात केली. पुढील कारवाई चालू आहे’, असे फडणवीस म्हणाले.
‘पुढची नीट परीक्षा योग्य पद्धतीने’
नीट पेपरफुटी प्रकरणामुळे नैराश्यातून आत्तापर्यंत तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या असल्याबद्दल विचारले असता, ‘ज्या लोकांनी नीट पेपरमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांनी विद्यार्थ्यांसोबत प्रचंड अन्याय केला आहे. केंद्र सरकार आणि तपास यंत्रणेने याची पाळेमुळे खणून काढत अनेकांना अटक केली आहे. त्यामुळे पुढील नीटची परिक्षा अतिशय योग्य पद्धतीने होईल. कुणालाही गडबड करता येणार नाही’, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
‘हिंसा करणाऱ्यांवर
कारवाईची सूचना’
इंधन तुटवड्यावरून राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर विरोधकांनी टीका केली आहे. याकडे लक्ष वेधले असता, ‘सध्या जागतिक संकट आहे. जगात अनेक देशांनी पेट्रोल-डिझेलची आणीबाणी घोषित केली आहे. काही ठिकाणी दोन-दोन दिवस लॉकडाऊन आहे. तरीही पेट्रोल-डिझेल देण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. काही ठिकाणी लोक जमा झाल्याने कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी हिंसक प्रवृत्ती दिसत आहे. त्यामुळे विनाकारण हिंसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत’, असे फडणवीस यांनी सांगितले.





