‘माझ्याबाबत कोणाला जे काही बोलायचे असेल ते बोलू दे, ते २० वर्षांपासून सुरू आहे,’ अशी प्रतिक्रिया कोलकाता नाइट रायडर्स संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने व्यक्त केली. काही महिन्यांपासून अजिंक्य रहाणेच्या भवितव्याबाबत मुंबई क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरू आहे. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत त्याच्या फारशा धावा झालेल्या नाहीत. मात्र, त्याने रविवारी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात आक्रमक अर्धशतक करून आपल्या बॅटने टीकाकारांना उत्तर दिले.
अजिंक्यने फटकेबाज अर्धशतक केले. मुंबई क्रिकेटमध्ये तुझ्याबाबत चर्चा सुरू आहे, त्यापार्श्वभूमीवर तुझे हे अर्धशतक त्यांना उत्तर आहे का अशी विचारणा अजिंक्यला करण्यात आली. त्यावर तो म्हणाला, ‘कोणाला जे काही बोलायचे असेल ते बोलू दे. माझ्या फलंदाजीचा सध्या मी पुरेपूर आनंद घेत आहे. मी किती गुणवान आहे, मी कोणत्या दर्जाचा खेळ करू शकतो, हे दाखवण्यासाठी मी काही करीत नाही. चाहते माझा खेळ बघत आहेत, तो पाहून ते व्यक्त होतील. दोन वर्षांपासून मर्यादित षटकांच्या सामन्यांत माझा खेळ उंचावला आहे. क्रिकेटपटू म्हणून माझी प्रगती झाली आहे. तोच माझा प्रयत्न असतो. कोणाला जे काही बोलायचे आहे ते बोलू शकतात.’ प्रभावी खेळीनंतर रहाणे पूर्णवेळ क्षेत्ररक्षण करू शकला नाही. पायात गोळे आल्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले. ‘मी काही मोठ्या प्रमाणावर जायबंदी नाही. आमचे गोलंदाज मारा करीत असताना मैदानाबाहेर राहणे हे त्रासदायक असते,’ असे त्याने सांगितले.
सिडनी : ‘ मुंबई इंडियन्स विरुद्धच्या आयपीएल सलामीला अष्टपैलू कॅमेरुन ग्रीन गोलंदाजी का करू शकला नाही?’ या प्रश्नावर, उत्तर त्याचे क्रिकेट बोर्डच ( क्रिकेट ऑस्ट्रेलिया ) देऊ शकेल, असे विधान करून कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने रविवारी खळबळ उडवून दिली होती. हा स्पष्टवक्तेपणा क्रिकेट ऑस्ट्रेलियाला (सीए) खटकला अन् सोमवारी स्पष्टीकरण देत त्यांनी रहाणेला प्रत्युत्तर दिले. ‘कोलकाता नाइट रायडर्सच्या व्यवस्थापनला ग्रीनची दुखापती अन् सद्यस्थिती याची पूर्ण माहिती आहे’, अशा शब्दांत सीएने अजिंक्यला सुनावले आहे. ‘कॅमेरुन ग्रीनला पाठीची दुखापत आहे, ज्यावर उपचार सुरू आहेत. त्याला थोड्या कालावधीसाठी गोलंदाजी करता येणार नाही’, असे प्रवक्त्याने स्पष्ट केले.






