विमानतळ सुसज्ज, सेवेची प्रतीक्षा

महाराष्ट्र टाइम्स

सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर येथील विमानतळे सज्ज आहेत. मात्र, विमानसेवा कमी आणि तिकिटे महाग आहेत. 'उडान' योजनेतून परवडणाऱ्या दरात सेवा मिळावी अशी मागणी आहे. यामुळे पर्यटनाला चालना मिळेल. विमानसेवा नियमित आणि स्वस्त झाल्यास नागरिक त्याचा लाभ घेतील. सरकारी मदतीने दरात कपात झाल्यास फायदा होईल.

विमानतळ सुसज्ज, सेवेची प्रतीक्षा
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

राज्यामध्ये सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर या शहरांमध्ये चांगल्या सुविधा असलेले विमानतळ आहेत. मात्र या शहरांना जोडणाऱ्या विमानसेवा अपेक्षित प्रमाणात उपलब्ध नाहीत. उपलब्ध विमानसेवांची तिकिटे महाग असल्याने तो पर्याय न स्वीकारता स्थानिक आणि त्या शहरांमध्ये जाऊ इच्छिणारे दुसरा पर्याय स्वीकारतात. त्यामुळे विमानसेवा वाढवणे आणि परवडणारे दर या दोन मागण्या ‘उडान’ या हवाई संपर्क योजनेच्या माध्यमातून प्रत्यक्षात याव्यात, असे मत व्यक्त होत आहे.

‘हम्पीला जाण्यासाठी पूर्वी बेंगळुरू विमानतळाचाच पर्याय होता. मात्र आता हुबळी हा अधिक चांगला पर्याय पर्यटकांसाठी उपलब्ध झाला आहे. गेल्या काही वर्षांत हुबळीला जाणाऱ्या हवाई पर्यटकांमध्ये वाढ झाली आहे. कन्नूर विमानतळामुळे वायनाड, उटीला जाणाऱ्या पर्यटकांना सोय उपलब्ध झाली. कोइम्बतूरला जाण्यापेक्षा प्रवासी कन्नूर विमानतळाकडे वळले. याच पद्धतीने सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर या विमानतळांवर विमानसेवांना चालना मिळाली आणि दरामध्ये कपात झाली, तर पर्यटकांना त्याचा फायदा होईल’, असे पर्यटन व्यावसायिक योगेश लेले यांनी सांगितले. ‘कोकणात जाणारा पर्यटक चार ते पाच हजारांचे तिकिटे काढण्यापेक्षा अधिक स्वस्त पर्याय म्हणून गोव्याला जाऊन परत येतो. मोपा विमानतळाने ही सोय उपलब्ध करून दिली आहे. यासोबतच रेल्वेची सोय तर पर्यटकांसाठी असतेच. दोन ते अडीच हजारांच्या आसपास विमानांची तिकिटे उपलब्ध झाली, तर कोकणातील पर्यटक आवर्जून जातील’, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कोल्हापुरामध्ये सहकारी संस्था, विविध उद्योग आहेत. या दृष्टीने कोल्हापूरही हवाई नकाशावर अधिक सक्रिय करण्यासाठी विमान तिकिटांच्या दरांवर नियंत्रण हा महत्त्वाचा पर्याय आहे, असे सांगण्यात येते. ‘नाशिकचे विमानतळ सक्रिय आहे. कुंभमेळ्याच्या दृष्टीने हे अधिक सक्रिय करण्यासाठी नाशिकला इतर शहरांशी अधिक प्रमाणात जोडणे गरजेचे आहे’, असे 'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स'च्या पर्यटन समितीचे अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी सांगितले. ‘‘उडान’अंतर्गत केवळ विमानतळ उभारून चालणार नाही, तर शहरांना जोडणारी विमानसेवा उपलब्ध व्हायला हवी. एखादे विमानतळ सुरू होताना त्या शहरापासून विमानसेवा दिली जाते; मात्र ती काही महिन्यांतच बंद केली जाते. नाशिकहून मोप्यासाठी विमानसेवा सुरू केली होती; मात्र आता ती दुसऱ्या शहराकडे गेली. यामुळे नाशिकच्या पर्यटकांवर परिणाम झाला. केवळ विमानसेवा सुरू केली हे दाखवण्यासाठी एखाद्या शहराची सेवा बंद होऊ नये’, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ‘कुंभमेळ्याच्या काळामध्ये उत्तर प्रदेशातील शहरे, दिल्ली यांना जोडणाऱ्या विमानसेवा सकाळच्या वेळेत नाशिकहून सुरू झाल्यास आणि त्यामध्ये सातत्य राहिल्यास याचा फायदा पर्यटनासोबतच कृषी व्यवसायासाठीही होऊ शकेल. अशा शहरांसाठी विमान तिकिटांच्या दरासाठी सबसिडी मिळण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न झाले पाहिजेत’, अशीही अपेक्षा व्यावसायिक व्यक्त करत आहेत.