दररोज सिटीबस मधून प्रवास करणाऱ्यांची संख्या सरासरी २२ हजार असून त्यांच्या माध्यमातून सिटीबस विभागाला सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. रिक्षा बंद मुळे सोमवारी सुमारे ५५ हजार प्रवाशांनी सिटीबसमधून प्रवास केला आणि त्यामुळे या विभागाचे उत्पन्न २१ लाखांपेक्षा जास्त झाले अशी माहिती सुपेकर यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगर : रिक्षा ‘बंद’ आंदोलनामुळे ‘ स्मार्ट सिटी ’ च्या सिटीबस विभागाला एक प्रकारचा जॅकपॉटच लागला आहे. दिवसभरात या विभागाचे उत्पन्न तिपटीपेक्षा जास्त झाले. प्रवाशांची संख्यादेखील २२ हजारांवरुन ५५ हजारांच्या घरात गेली.
रिक्षा चालकांनी सोमवारी बंद पुकारला. या ‘बंद’मुळे नागरिकांचे हाल होणार याची पूर्वकल्पना आल्यामुळे ‘स्मार्ट सिटी’ च्या सिटीबस विभागाने नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून नियोजन केले.
सिटीबस विभागाचे मुख्य चालन अधिकारी संजय सुपेकर यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले, की रोज ७५ बस चालविल्या जातयेतात. रिक्षाचालकांनी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर दहा बस वाढवण्यात आल्या आणि ८५ बस रस्त्यावर उतरवण्यात आल्या. मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानग, रेल्वे स्थानक, महावीर चौक, पंचवटी चौक, हर्सूल टी पॉइंट या महत्त्वाच्या ठिकाणी अतिरिक्त दोन - दोन पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली. नागरिकांना बससेवेबद्दल माहिती देणे, बस उपलब्ध होते की नाही यावर लक्ष ठेवण्याचे काम या पर्यवेक्षकांना देण्यात आले. स्मार्ट सिटी कार्यालयातील नियंत्रण कक्षातूनदेखील प्रत्येक स्पॉटवर लक्ष ठेवले जात होते. ज्या ठिकाणी गर्दी जास्त आहे त्या ठिकाणी जास्त बस दिल्या जात होत्या.




