दोन अन्नपूर्णा

Contributed byमानिनी वैद्य|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

लेखिकेच्या आई आणि सासूबाई या दोघीही उत्तम स्वयंपाक करणाऱ्या होत्या. त्यांच्या हातच्या पुरणपोळ्या, शिरा, धपाटे आणि इतर पदार्थ लेखिकेला आजही आठवतात. या दोघींच्या मायेची चव त्यांच्या आठवणीत कायम आहे. त्यांच्या स्वयंपाकाची आठवण आजही ताजी आहे.

दोन अन्नपूर्णा

ईच्या हातात जणू जादू असते. तिच्या प्रत्येक पदार्थामध्ये प्रेमाची चव उतरलेली असते. माझी आई उमा जहागीरदार अन्नपूर्णा होती. तिचा प्रत्येक पदार्थ रुचकर होत असे. नवीन पदार्थ पाहिला, की तो करून पाहणं आणि खाऊ घालणं हा तिचा छंद होता. तिनं केलेलं साधं जेवणही रुचकर लागत असे. माझा सर्वांत आवडीचा पदार्थ म्हणजे, तिच्या हातच्या मऊ, लुसलुशीत पुरणपोळ्या. आम्हा भावंडांना व वडिलांना तिनं केलेल्या गरम गरम पुरणपोळ्या खूप आवडत. सण आला; जेवणाला बसलो, की गरम गरम पुरणपोळ्या खाऊन मन तृप्त होत असे. म्हैसूरपाक असो किंवा तिळगुळाचा हलवा, पपईच्या वड्या, आंब्याच्या रसाच्या वड्या... सारे पदार्थ ती आवडीनं सहज करीत असे. माझ्या बाळंतपणाच्या वेळी आईनं केलेला बदामाचा शिरा अप्रतिम होता. माझ्या जिभेवर त्याची चव अजूनही रेंगाळते. बदाम रात्रभर पाण्यात भिजवून, सकाळी त्याची सालं काढून, त्याची पूड करून, साजूक तुपावर खरपूस भाजून, साखर व वेलचीपूड घालून तिनं तो केलेला. माझा नवरा आणि मुलगी त्या शिऱ्याची आठवण कायम काढत असतात.

माझ्या आयुष्यात आलेली दुसरी अन्नपूर्णा म्हणजे, माझ्या सासूबाई, दुर्गाताई कुलकर्णी. त्यांच्याही हाताला खूप चव होती. प्रेमानं खाऊ घालण्याचा त्यांचा स्वभाव होता. मला त्यांच्या हातच्या गरम पुरणपोळ्या, धपाटे आणि मेथीची गोळाभाजी विशेष आवडत असे. त्यांनी केलेली पुरणपोळी, विशेषतः पुरण फारच छान, खमंग शिजवलेलं असे. भरपूर पुरण भरून, छान खरपूस भाजलेली पोळी साजूक तूप घेऊन खाताना स्वर्गसुख मिळत असे. कुणी नातेवाइक गावाला जाणार असेल, तर त्या भल्या पहाटे उठून त्यांना खमंग धपाटे करून देत असत. मेथीची गोळाभाजी मी त्यांच्याकडूनच शिकले. स्वित्झर्लंडला जाताना आईंनी करून दिलेल्या शेंगदाणा, जवस, कारळ, तिळाच्या चटण्या, मेतकूट आणि जवस घालून केलेलं आंब्याचं अतिशय चवदार लोणचं आजही लक्षात आहे. अशा माझ्या जीवनातील दोन अन्नपूर्णांना शतशः नमन. आज या दोघीही जगात नसल्या, तरी त्यांच्या मायेची चव आमच्यासोबत कायम आहे.