लखनौ : कानपूर येथे आयटीबीपी जवान आणि त्याच्या कुटुंबासोबत घडलेल्या घटनेची राज्य सरकारने उच्चस्तरीय चौकशी सुरू केली असून, या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी रविवारी दिली आहे. ‘आम्ही संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य महासंचालकांना संपूर्ण वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
कानपूरमध्ये भारत-तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी) दलातील सशस्त्र जवानांनी पोलिस आयुक्तालयाला वेढा घातल्याचा प्रकार समोर आला. एका सहकाऱ्याच्या तक्रारीवर कारवाई न झाल्याने हे जवान संतप्त झाले होते. आयटीबीपीचे जवान आयुक्तालय विविध ठिकाणी उभे असल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. कारवाईच्या आश्वासनानंतर जवान निघून गेल्यावर हा तणाव निवळला.
‘आयटीबीपी महाराजपूर’ येथे कार्यरत असलेले जवान विकास सिंग १९ मे रोजी आपल्या आईचा कापलेला हात घेऊन थेट पोलिस आयुक्तालयात आले. आईच्या दुर्दशेसाठी जबाबदार खासगी रुग्णालयातील संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. सिंग यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले, की त्यांच्या आईला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांनी सुरुवातीला कृष्णा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्यांच्या आईच्या हाताला संसर्ग (इन्फेक्शन) झाला. तिथे उपचार करूनही प्रकृती अधिकच बिघडत गेली. त्यानंतर त्यांनी आईला पारस रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांना संसर्ग पसरू नये म्हणून त्यांच्या आईचा हात कापावा लागला. यासाठी पारस रुग्णालयाने कृष्णा रुग्णालय जबाबदार असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘कृष्णा रुग्णालयातील डॉक्टर आणि आयसीयू कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, एवढीच मागणी आहे,’ असे विकास सिंग यांनी म्हटले आहे. मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी चौकशी समिती स्थापन केली.





