नक्की मुंबईतच राहतेस ना संचिता, तरी तुला तिथं जाता आलं नाही, नवलं आहे तुझं...’ मैत्रिणीचे हे शब्द डोक्यात घोळत राहतात.
मला लहानपणापासून कधी मनसोक्त फिरता आलं नाही. नातेवाइक किंवा देवदर्शन या पलीकडे मी कुठंही गेले नाही; कारण परिस्थिती तशी होती. हॉटेलात गेलो, तरी पावभाजीशिवाय दुसरं काही घेण्याची कधी हिंमत झाली नाही. त्या वेळी पॉकेटमनी सोडाच; कधी मला ‘हे हवंय’ असं म्हणायची हिंमतही होत नसे. मुंबईतलं ‘मरीन ड्राइव्ह’ अनेकांचं आवडतं. त्याबद्दल सगळं ऐकून होते; पण कधी जायचा प्रसंग आला नाही. मी खूप जणांची रील आणि फोटो पाहते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खूप समाधान वाटतं. किती छान आनंद घेतात, ही सगळी मंडळी. काही क्षण मरिन ड्राइव्हवर बसायची आणि फेरफटका मारायची तीव्र इच्छा आहे. राहून गेलेली ही गोष्ट कधी पूर्ण होते पाहू या!





