नका अंत पाहू...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नाशिक महापालिका आणि महाराष्ट्र सरकार नागरिकांना गृहीत धरत आहे. रस्त्यांची कामे रखडली आहेत. दुसरीकडे, सीजेपी (कॉक्रोच जनता पार्टी) ने समाजमाध्यमांवर मोठी लोकप्रियता मिळवली आहे. यातून सत्ताधाऱ्यांच्या खोट्या लोकप्रियतेचा फुगा फुटल्याचे दिसते. एआय तंत्रज्ञानामुळे सृजनात्मक लेखनासमोरही आव्हान उभे राहिले आहे. हे सर्व मुद्दे सध्या चर्चेत आहेत.

नका अंत पाहू...

सध्या नाशिक महापालिका व महाराष्ट्र सरकारने नाशिककरांना सर्वच बाबतीत गृहीत धरून मनमानीचा जो कळस गाठला आहे, त्याचा सामान्य माणूस शांततेने व संयमाने सामना करीत आहे. याचा असा अर्थ नक्कीच नाही, की अजूनही नागरिकांमध्ये सहनशीलता आहे. ते निश्चितच चुकीचे आहे हे सरकार, प्रशासनाने जितके लवकर लक्षात घेतले तितके चांगले राहील. सध्या संपूर्ण महापालिका क्षेत्रात असा एकही रस्ता नाही, की ज्यावर सामान्य नागरिक निश्चित आणि बिनदिक्कतपणे प्रवास करू शकतो. पावसाळा तोंडावर येऊनही जर कोणतेच काम पूर्ण तर सोडाच, साधारण महिनाभरात पूर्ण होईल याची शाश्वती आयुक्त, लोकप्रतिनिधी किंवा घटनाबाह्य कुंभमेळामंत्री देऊ शकतील का? कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याची परिणती काय होते हे कुणी सांगायची गरज नाही. नका अंत पाहू. कारण या विकासकामांच्या खेळात निरपराध लोकांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे.

- राजेंद्र लिमये, नाशिक


नका अंत पाहू...

झुरळाचे विश्वरूपदर्शनसीजेपी (कॉक्रोच जनता पार्टी) या आभासी पक्षाने चार-पाच दिवसांतच दोन कोटींवर पाठीराखे मिळवून समाजमाध्यमांवरील लोकप्रियतेत सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षांनाही मागे टाकल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. भारतात निर्माण झालेल्या या समाजमाध्यमी आंदोलनाची दखल देश-विदेशातील माध्यमांनीही घेतल्याचे बघितल्यावर एक प्रकारे झुरळाचे विश्वरूपदर्शन घडले. सत्ताधाऱ्यांच्या खोट्या लोकप्रियतेचा फुगा फुटला. जनमत पूर्णपणे विरोधात असतानाही त्यांचे उमेदवार निवडून कसे येतात, अशी शंका निर्माण होते. निवडणूक आयोग, तपास यंत्रणा, न्यायव्यवस्थेचा गैरवापर होत असल्याबाबत विरोधक वारंवार करीत असलेल्या आरोपांनाही पुष्टी मिळते.

- किशोर थोरात, नाशिक

एआयचे सर्वदूर आव्हान

एआय तंत्रज्ञानाचे आक्रमण भाषांतराच्याही पलीकडचे आहे. किंबहुना एआयचे संकट याहूनही चिंताजनक व गंभीर वाटते. मूळ रूप सृजनात्मक, म्हणजे ललित लेखनावरदेखील प्रतिकूल आक्रमण दिसते. आता टेलर-मेड कथा, कविता, कादंबरीवाङ्मय एका 'क्लिक'ने सहज निर्माण करता येणार असल्यामुळे प्रतिभाशाली कवी, लेखकांनाच आव्हान मिळणार असून, कदाचित त्यांचे लेखन बंद पडण्याची शक्यता आहे. ही भीती अधिक त्रासदायक वाटते.

- शिरीष चिंधडे, मुंबई