बॉम्बस्फोटासाठी ‘एआय’चा वापर

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणात दहशतवाद्यांनी 'चॅटजीपीटी' आणि यूट्यूबचा वापर केला. एनआयएच्या आरोपपत्रानुसार, आरोपींनी रॉकेट आणि स्फोटके बनवण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली. जम्मू-काश्मीरमध्ये चाचण्या घेण्यात आल्या. उच्चशिक्षित डॉक्टर आणि इंजिनिअर या कटात सामील होते. सुरक्षा यंत्रणांनी हे जिहादी नेटवर्क उद्ध्वस्त केले.

बॉम्बस्फोटासाठी ‘एआय’चा वापर

गेल्या वर्षी १० नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणात दहशतवाद्यांनी यूट्युबबरोबरच ‘चॅटजीपीटी’सारख्या कृत्रिम प्रज्ञेवर (एआय) आधारित प्लॅटफॉर्मचा वापर केल्याचे निदर्शनास आले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) नुकत्याच दाखल केलेल्या आरोपपत्रात ही माहिती देण्यात आली आहे.

‘एनआयए’ने विशेष न्यायालयात १४ मे रोजी साडेसात हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले. त्यात लाल किल्ला स्फोटप्रकरणी अनेक धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. या हल्ल्यामागे अल-कायदाशी संबंधित अन्सार ‘गझवात उल हिंद’ या दहशतवादी प्रारूपाचा हात होता. या कटात सहभागी असलेल्या मुख्य आरोपीने रॉकेट आणि स्फोटके बनविण्यासाठी यूट्यूब आणि चॅटजीपीटी यांची मदत घेतली. डॉक्टर आणि उच्चशिक्षितांचा समावेश असलेल्या या दहशतवादी हल्ल्या प्रकरणी हरियाणातील फरिदाबादच्या ‘अल फलाह’ विद्यापीठातील तीन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.

‘इन हाउस इंजिनीअर’ असलेल्या जसीर बिलाल वाणी याने या कटात तंत्रसहाय्य केले; तर डॉ. उमर उन नबी याने स्फोटकांनी भरलेली कार चालवून आत्मघाती हल्ला घडवून आणला; तर डॉ. आदिल राथर याने स्फोटकांसाठी आवश्यक पोटॅशियम नायट्रेटचा पुरवठा केला होता. या हल्ल्यात ११ जणांचा मृत्यू झाला होता.

जंगलात चाचण्या

आरोपींनी केवळ डिजिटल प्लॅटफॉर्मवरूनच माहिती गोळा केली, असे नाही तर जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील जंगलात रॉकेट आणि सिलिंडर आयईडीच्या चाचण्याही घेतल्या. या ठिकाणांवरून स्फोटकांचे अवशेष जप्त केले आहेत. याशिवाय, सुरक्षा दलांवर हल्ला करण्यासाठी ड्रोनची पेलोड क्षमता वाढवून त्याचे शस्त्रामध्ये रूपांतर करण्याचीही त्यांची योजना होती. दहशतवादी कारवायांसाठी अत्याधुनिक आयुधांचा वापर करण्यात येत असून तपास यंत्रणांसाठी आव्हानात्मक बाब बनली आहे.

आरोपी जसीर वाणी याने आयईडीचे ट्रिगर मेकॅनिझम तयार करण्यासाठी ‘फ्लिपकार्ट’वरून विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू, सेन्सर, रिमोट कंट्रोल रिले-स्विच आणि सोल्डरिंग किट्स ऑनलाइन मागवले होते. यासाठी डॉ. उमरने पैशांची रसद पुरवली होती. या प्रकरणातील मुख्य स्फोटक ‘टीएटीपी’ हे आरोपींनी स्वतः प्रयोग करून प्रयोगशाळेच्या दर्जाचे तयार केले होते. ‘एनआयए’च्या वैज्ञानिक आणि फॉरेन्सिक तपासामुळे उच्चशिक्षित वैद्यकीय व्यावसायिकांचे हे जिहादी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यात सुरक्षा यंत्रणांना मोठे यश आले आहे.