बाजारात १५०० भाव, शेतकऱ्यांना सहाशेच

महाराष्ट्र टाइम्स

जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात आहेत. बऱ्हाणपूर मंडईत केळीला १५०० रुपये क्विंटल भाव मिळत असताना, जळगावमध्ये व्यापारी शेतकऱ्यांकडून केवळ ५०० ते ७०० रुपये क्विंटल दराने खरेदी करत आहेत. आमदार अमोल जावळे यांनी या प्रकरणी प्रशासनाकडे तक्रार केली आहे. व्यापाऱ्यांच्या या संगनमतामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यावर तातडीने कारवाईची मागणी होत आहे.

बाजारात १५०० भाव, शेतकऱ्यांना सहाशेच
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

बाजारात केळीला चांगले भाव असतानाही, स्थानिक पातळीवर व्यापारी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करीत आहे. बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) बोर्डावर प्रतिक्विंटल १५०० रुपयांपर्यंत भाव असताना जळगाव जिल्ह्यात प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडून ५०० ते ७०० रुपये दराने केळी खरेदी केली जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी आमदार अमोल जावळे यांनी लेखी तक्रार केली असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

जळगावची केळी देश-विदेशात निर्यात होत असली, तरी स्थानिक शेतकऱ्यांच्या नशिबी मात्र संघर्षच येत आहे. शेजारील मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर मंडईत केळीला प्रतिक्विंटल १५०० ते १७०० रुपये दर मिळत आहे. नियमानुसार जळगावचे दर बऱ्हाणपूरच्या दरांवर आधारित असतात. मात्र, जळगावात काही व्यापारी शेतकऱ्यांकडून केवळ ५०० ते ७०० रुपये दराने खरेदी करत आहेत. ही लूट शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी ठरत आहे.

आमदार जावळेंकडून तक्रार

बऱ्हाणपूर मंडीत १७०० रुपये दर असताना जिल्ह्यात ५००-६०० रुपयांनी खरेदी होणे हा शेतकऱ्यांवर मोठा अन्याय आहे. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी व्यापाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार अमोल जावळे यांनी पत्राद्वारे केली आहे.

उत्पादन खर्च, महागडी खते, मजुरी आणि वाहतूक खर्च यामुळे शेतकरी आधीच आर्थिक विवंचनेत आहे. त्यातच व्यापाऱ्यांनी संगनमत करून दर पाडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेषतः लहान आणि मध्यम शेतकरी या ‘रॅकेट’मध्ये भरडले जात असून, त्यांना कवडीमोल दराने माल विकण्यास भाग पाडले जात आहे. या प्रचंड दरघटीमुळे संपूर्ण पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. योग्य भाव मिळाला नाही, तर भविष्यात केळीच्या उत्पादनात मोठी घट होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.