माजी उपनगराध्यक्षांचा मुलगा अपघातात ठार

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

जळगाव येथे माजी उपनगराध्यक्षांचा मुलगा अविनाश संजय चौधरी यांचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. धुळे येथे स्पिरिटची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नाशिकरोड येथे सराफाच्या दुकानातून ९७ लाखांची मोठी चोरी झाली. धुळे महापालिकेत स्थायी समिती व महिला बालकल्याण समिती सदस्यांची निवड करण्यात आली.

former deputy mayors son dies in accident commotion at dharnagav site

जळगाव : खासगी कामासाठी एरंडोलकडे जात असताना धरणगाव येथील तरुणाच्या कारला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात कार उलटून अविनाश संजय चौधरी (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.३०) दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास बोरगावनजीक घडली. अविनश धरणगावच्या माजी उपनगराध्यक्षा प्रतिभा चौधरी यांचे पुत्र होते. धरणगाव पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

स्पिरिटची अवैध वाहतूक

धुळे : नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करीत अवैधरीत्या स्पिरिटची वाहतूक करणाऱ्या वाहनावर छापा टाकून दारू तयार करण्यासाठी नेल्या जात असलेल्या ४५० लिटर स्पिरिटसह सुमारे ८ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वाहनचालक वसंत कुशाल पावरा (रा.बिलगाव, ता.धडगाव, जि. नंदुरबार)याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यासोबतचा संशयित फरार आहे. शहादा पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला.

स्थायीसाठी सदस्यनिवड

धुळे : महापालिकेच्या स्थायी समिती व महिला बालकल्याण समिती सदस्यांची सोमवारी (दि. ३०) पहिल्याच महासभेत निवड करण्यात आली. स्थायी समिती सदस्यांमध्ये योगिता कुटे, कृपेश नांद्रे, विजय देवरे, शीतल वाघ, अमोल मासुळे, लताबाई सोनार, युवराज उर्फ सनी चौधरी, वंदना भामरे, चेतन गवळी, नीलेश नेमाणे, विक्रम थोरात आदींचा समावेश आहे.

९७ लाखांची दागिनेचोरी

नाशिकरोड : लहवित येथील माळवाडी परिसरात चोरट्यांनी सराफाच्या दुकानाचे शटर उचकटवून तब्बल ९७ लाखाचा ऐवज चोरून नेल्याने खळबळ उडाली आहे. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात संतोष रत्नाकर कुलथे यांनी फिर्याद दिली आहे. चोरीला गेलेल्या वस्तूंमध्ये ५६ लाख रुपये किमतीचे अंदाजे ४०० ग्राम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. चोरट्यांनी ४० लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने चोरून नेले. पोलिस निरीक्षक प्रवीण देवरे, उपनरीक्षक शाम कोटमे, आदी तपास करत आहेत.