चेंबूरमध्ये व्यापाऱ्याला सात लाखांचा गंडा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

चेंबूरमध्ये एका व्यापाऱ्याला सायबर गुन्ह्यातून सात लाखांचा फटका बसला. सिन्नरमध्ये बसस्थानकावर वृद्धाच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरीला गेली. जळगावमध्ये कुंटणखान्यावर कारवाईत बांगलादेशी महिला सापडली. निफाडमध्ये शेतजमिनीच्या वादातून ट्रॅक्टरने महिलेला चिरडल्याचा आरोप आहे. जळगाव जिल्ह्यात ट्रकला आग लागून एकाचा मृत्यू झाला.

चेंबूरमध्ये व्यापाऱ्याला सात लाखांचा गंडा

मुंबई : चेंबूर येथील रहिवासी असलेल्या भारतकुमार यांचे चप्पलविक्रीचे दुकान आहे. एका व्हॉट्सॲप ग्रुपवर त्यांनी ‘ई-चलान’बाबत एक संदेश वाचला. ‘ई-चलान’ थकीत आहेत का? हे पाहण्यासाठी त्यांनी या संदेशातील लिंकवर क्लिक केले. क्लिक करताच एक ‘एपीके’ फाइल डाऊनलोड होऊन एक अर्ज उघडला गेला. भारतकुमार यांनी त्यामध्ये माहिती व बँक खात्याचा तपशील भरला. हा अर्ज सबमिट करताच त्यांच्या मोबाइलमध्ये एकापाठोपाठ एक ‘ओटीपी’चे संदेश येऊ लागले.

वृद्धाची चेन लंपास

सिन्नर : बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने बसमध्ये चढताना एका वृद्धाच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चेन लंपास केल्याची घटना घडली. अशोक जबाजी पवार (वय ६८) हे शनिवारी सकाळी सुमारे दहा वाजता हा प्रकार झाला. काही वेळाने चोरी लक्षात येताच पवार यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. चोरी गेलेल्या चेनची किंमत सुमारे ६० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. सिन्नर पोलिसांत गुन्हा दाखल असून, अधिक तपास सुरू आहे.

‘ती’ महिला बांगलादेशी

जळगाव : निमखेडी रोडवरील ‘ब्रह्मांडनायक अपार्टमेंट’ येथे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर जळगाव पोलिसांनी २१ मे २०२६ रोजी छापा टाकला होता. याप्रकरणी तपासात सुटका करण्यात आलेल्या महिलांपैकी एक महिला बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले. या परदेशी महिलेने बनावट भारतीय ओळखपत्राचा वापरून जळगावात वास्तव्य केल्याचे उघड झाले.

‘आत्मपरीक्षणाची वेळ’

जळगाव : सोशल मीडियावर सध्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या वाढत्या ट्रेंडवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना घरचा अहेर दिला आहे. ते म्हणाले की, एका सामान्य तरुणाच्या आवाहनाला संपूर्ण देशभरातून मोठा प्रतिसाद मिळणे सर्व सत्ताधाऱ्यांसाठी आत्मपरीक्षण करायला लावणारा विषय आहे. आमच्यासारख्या सर्वच नेत्यांवर आणि राजकीय पक्षांवर आता आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे आणि ते आम्ही केलेच पाहिजे, असेही आमदार पाटील म्हणाले.

वादातून अंगावर ट्रॅक्टर

निफाड : पिंपळगाव बसवंत येथे शेतजमिनीच्या वादातून ट्रॅक्टर अंगावर घालून महिलेला गंभीर जखमी केल्याचा आरोप असून, पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार अजय विष्णुगिरी गोसावी यांच्या गट नं. ४८७/१ व ४८७/२ जमिनीचा न्यायालयात वाद सुरू आहे. शनिवारी दुपारी वादग्रस्त शेतात ट्रॅक्टरने नांगरणी सुरू असल्याचे कळताच गोसावी कुटुंबीय तिथे गेले. चालक अजय उन्हाळे याने रश्मी गोसावी यांच्या अंगावर ट्रॅक्टर घातल्याने त्यांना दुखापत झाली. सुवर्णा गोसावी व अजय गोसावीही जखमी झाले.

ट्रकला आग; एकाचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यातील मुक्ताईनगरहून मलकापूरकडे पशुखाद्य घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग लागून झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री पिंप्री अकराऊत गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर घडली. दिनेश (पूर्ण नाव नाही, वय ३५) असे मृताचे नाव आहे, तर जखमी चालक जाबाराभाई ठेंबाभाई गोरसेरा (वय ३३) यांच्यावर उपचार सुरू आहेत.