मुंबई : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पाणी फाउंडेशन यांच्यातर्फे एप्रिल २०२६मध्ये चार ‘विशेष डिजिटल शेती शाळा ’ आयोजित करण्यात येत आहेत. राज्यातील कृषी विद्यापीठे, कृषितज्ज्ञ आणि प्रगतिशील शेतकरी यात सहभागी होतील. एक एप्रिल, आठ एप्रिल, १५ एप्रिल आणि २२ एप्रिलला सायंकाळी या शेतीशाळा ७.३० वाजता सुरू होणार असून, त्यांचे लाइव्ह प्रसारण कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, पाणी फाउंडेशन आणि ‘उमेद’च्या यू-ट्यूब चॅनेलवर केले जाणार आहे.
मोहीम उद्यापासून
मुंबई : ‘माझे गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे अभियान एक एप्रिलपासून सुरू होत आहे. संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजार, माता-बाल आरोग्य आणि मानसिक आरोग्य याचाही यात समावेश आहे. अभियानासाठी राज्य सरकारने ८०.७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र यांना कोट्यवधींची बक्षिसे दिली जातील.
निवडणुका लांबणीवर
मुंबई : राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीमुळे सहकार विभागाने अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ मे २०२६ पर्यंत पुढे ढकलल्या आहेत. विभागाने सोमवारी हा शासन आदेश जारी केला. या आदेशातून सहकारी गृहनिर्माण संस्थांना वगळले आहे. संस्थांच्या निवडणुकीनंतरची पहिली पदाधिकारी निवड करणे, अध्यक्ष, उपाध्यक्षांचा राजीनामा वा मृत्यूमुळे अन्य पदाधिकाऱ्यांची निवड करणे, क आणि ड वर्गातील सहकारी संस्थांची निवडणूक; तसेच नामनिर्देशन टप्पा सुरू झालेल्या निवडणुका यांना हा आदेश लागू राहणार नाही.
यात्रेसाठीभाविक दाखल
कोल्हापूर : श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथील महाराष्ट्राचे कुलदैवत जोतिबाची चैत्री यात्रा सुरू झाली असून यात्रेचा बुधवारी मुख्य दिवस आहे. यात्रेसाठी भाविक मोठ्या प्रमाणात डोंगरावर दाखल होत आहेत.






