कुंभमेळा मंत्र्यांची ‘डायलॉग डिप्लोमसी’

महाराष्ट्र टाइम्स

नाशिकमध्ये २०२७ साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी साधू-महंतांच्या भेटी घेऊन त्यांच्या सूचना जाणून घेतल्या. विकासकामे, सोयीसुविधा आणि धार्मिक परंपरा जपण्यावर चर्चा झाली. कामांची गती वाढवण्यावर भर दिला जात आहे. साधू-महंतांच्या नाराजीची दखल घेण्यात आली आहे.

कुंभमेळा मंत्र्यांची ‘डायलॉग डिप्लोमसी’
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

नाशिकमध्ये सन २०२७ मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी नियोजनाला वेग देतानाच, साधू महंतांच्या भेटीगाठी घेऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. गेल्या दोन दिवसांत त्यांनी नाशिक व त्र्यंबकेश्वरमधील विविध मठ, आश्रम व संतांच्या भेटी घेऊन नियोजनांसदर्भातील माहिती दिली. तसेच साधू महंताच्या सूचनांचा समावेश नियोजनात केला जाईल, असे आश्वासन दिले.

सिहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाची तारीख अवघ्या नऊ महिन्यांवर येऊन ठेपल्यानंतरही सिंहस्थाची कामे संथ गतीने सुरू आहेत. सिंहस्थाच्या कामांवरून नाशिक व त्र्यंबकेश्वरमधील साधू महंतांमध्ये नाराजीची भावना आहे. त्यामुळे साधू-महंतांच्या नाराजीची दखल घेऊन महाजन यांनी त्यांच्याशी संवाद सुरू केला आहे. गेले दोन दिवस महाजन यांनी कैलास मठ भक्तिधाम येथे आचार्य शंकर भारती, कैलास मठाचे स्वामी सविदानंद सरस्वती, अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय महामंत्री स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. याप्रसंगी महंत भक्तिचरणदास, माजी आमदार बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष सुनील केदार तसेच आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. या भेटीत विकासकामांचे नियोजन, साधू-संतांच्या सोयीसुविधा, वाहतूक व्यवस्था, निवास व्यवस्था तसेच धार्मिक परंपरा अबाधित राखत आधुनिक सुविधा कशा उभारता येतील, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.