बुलढाणा : डिझेलसाठी त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी शनिवारी दुपारी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात नागपूर-पुणे महामार्ग दोन तास रोखून धरला. चिखली तालुक्यातील मेरा चौकी येथील पेट्रोल पंपाजवळ हे आंदोलन करण्यात आले. कॅनमध्ये डिझेल आणि पेट्रोल मिळण्याची मागणी यावेळी रेटून धरण्यात आली.
‘युद्धाचा परिणाम नाही’
नागपूर : ‘मध्य पूर्वेतील संघर्ष हा एक तात्पुरता अडथळा आहे. याचा भारताच्या औद्योगिक वाढीवर फार काळ परिणाम होणार नाही. हा संघर्ष जास्तीत जास्त एक ते दोन महिन्यांत संपेल. उद्योजक हे २० ते ५० वर्षांचा दीर्घकालीन विचार करून गुंतवणूक करत असतात. त्यामुळे देशाचा विकास रथ असाच वेगाने पुढे जात राहील’, असे वक्तव्य जेएसडब्ल्यू ग्रुपचे अध्यक्ष सज्जन जिंदाल शनिवारी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.
दीपकेंच्या घरी बंदोबस्त
वाळूज महानगर : कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या सिडको महानगर १ येथील ‘शंकरसदन’ या बंगल्याभोवती शनिवारी (२३ मे) पोलिसांनी कडक सुरक्षा तैनात केली आहे. अभिजित दिपके यांच्या आई-वडिलांच्या घराला संरक्षण देण्याची सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केल्या होत्या. त्यानुसार बंदोबस्त देण्यात आला, असे पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी सांगितले.
दोघांचा अपघाती मृत्यू
भंडारा : साकोली तालुक्यात शनिवारी दुपारच्या सुमारास वैनगंगा इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या कुणाल गोटफोडे व महेश कामशेलवार या विद्यार्थ्यांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. पळसपाणी ते चांदोरीदरम्यान दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट रस्त्याशेजारील झाडाला जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही विद्यार्थ्यांना आपले प्राण गमवावे लागले.
‘युवाशक्ती काँग्रेससह’
पुणे : ‘कॉक्रोच जनता पार्टी’ला मिळणारा मोठा प्रतिसाद पाहून ते देशाबाहेरचे आहेत, असा गैरसमज पसरवत त्यांच्यावर बंदी आणली गेली, असा आरोप काँग्रेसचे नेते व माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी शनिवारी केला. त्याचवेळी युवकांचा काँग्रेसलाच पाठिंबा असल्याचाही दावा त्यांनी केला.
कारखाना उद्ध्वस्त
गडचिरोली : पोलिसांनी पोमके-बिनागुंडा जंगल परिसरात लपवून ठेवलेला शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त केला. आत्मसमर्पित माओवाद्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत शस्त्रनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामग्रीसह विविध साहित्य हस्तगत करण्यात आले आणि ते घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.
तेंदूपत्ता संकलन बंद
चंद्रपूर : गुंजेवाही परिसरात वाघिणीचे बछड्यांसह वास्तव्य असून, एक वाघदेखील दृष्टीस पडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वन विभागाने तातडीने शुक्रवारीच परिसरात तीन लाइव्ह व ३० कॅमेरे ट्रॅप लावलेले आहेत. हल्लेखोर वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना प्रस्ताव पाठविला आहे. या परिसरातील तेंदूपत्ता संकलनाची कामे थांबविण्यात आली आहेत.







