राज्यातील धरणांत ३० टक्के साठा

महाराष्ट्र टाइम्स

राज्यातील धरणांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. अनेक धरणांमध्ये उपयुक्त जलसाठा अत्यंत कमी आहे. एल निनोच्या प्रभावामुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे राज्य सरकारने पाणी वापर नियोजनावर भर दिला आहे. आगामी काही आठवडे पावसासाठी निर्णायक ठरणार आहेत. खबरदारी घेणे आवश्यक आहे.

water storage in state dams down by 30 percent

‘एल निनो’च्या सावटामुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असतानाच, दुसरीकडे राज्यातील धरणांमधील पाणीसाठा ३०.८८ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. जलसंपदा विभागाने शनिवारी ही आकडेवारी जाहीर केली. विभागनिहाय विचार करता, पुणे विभागातील धरणांमध्ये सर्वांत कमी पाणीसाठ्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, नाशिक विभागातही धरणांची स्थिती गंभीर असून, ३१.२३ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे.

जलसंपदा विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील तीन हजार २८ धरणांमध्ये सध्या १२,६१२.५९ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. एकूण प्रकल्पीय उपयुक्त क्षमता ४०,८४७.९ दशलक्ष घनमीटर इतकी आहे.

नाशिक विभागातही काही धरणांची स्थिती गंभीर आहे. भावली धरणात शून्य टक्के, अर्जुनसागरमध्ये ६.०८ टक्के आणि वाघाड धरणात केवळ ५.४५ टक्के उपयुक्त पाणी आहे. तर पुणे विभागातील अनेक महत्त्वाच्या धरणांमधील साठा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. भाटघर धरणात ८.२६ टक्के, माणिकडोहमध्ये ६.११ टक्के, घोड धरणात अवघा १.७२ टक्के, तर टेमघर आणि लोणावळा टाटा धरणांमध्ये शून्य टक्के उपयुक्त साठा नोंदवण्यात आला आहे.

पाणी वापर नियोजनावर भर

गेल्यावर्षी याच दिवशी राज्यातील धरणांमधील पाणीसाठा २७.८५ टक्के होता. त्या तुलनेत यंदा उपलब्ध पाण्याची टक्केवारी किंचित अधिक असली, तरी खबरदारी घेण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. यंदा ‘एल निनो’चा प्रभाव आणि सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने राज्य सरकारने जलसंधारण आणि पाणी वापर नियोजनावर भर दिला आहे. आगामी काही आठवडे पावसाच्या दृष्टीने निर्णायक ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.