अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील वेबसाईट संदर्भातील तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या वतीने (एनएसयूआय) करण्यात आली. संघटनेच्या शिष्टमंडळाने शिक्षण उपसंचालकांची भेट घेत या प्रश्नी निवेदन दिले.
शिक्षण विभागाकडून अकरावी ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. त्यात तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी, पालकांची होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच नियमित फेरीत मुख्य पोर्टल पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे हजारो विद्यार्थी, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नोंदणी, अर्ज व्हेरीफाय करणे, पसंतिक्रम भरण्यास विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी येत आहेत. या गंभीर तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी प्रवेश अर्ज भरण्याची मुदत वाढवून मिळावी, असे एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष अभिषेक शिंदे पाटील यांनी म्हटले आहे.








