भारत मोठा संरक्षण निर्यातदार

महाराष्ट्र टाइम्स

भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रात खासगी उद्योगांना मोठ्या संधी मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारत' संकल्पनेमुळे देश शस्त्रास्त्रांचा मोठा निर्यातदार बनणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी शिर्डी येथे एका प्रकल्पाचे उद्घाटन केले. महाराष्ट्रात संरक्षण उत्पादनाचे चार मोठे समूह विकसित होत आहेत. यामुळे भारताची संरक्षण सज्जता अधिक मजबूत होईल.

भारत मोठा संरक्षण निर्यातदार
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘ आत्मनिर्भर भारत ’ संकल्पनेमुळे संरक्षण उत्पादन क्षेत्रात खासगी उद्योगांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आपला देश आता शस्त्रास्त्रांचा सर्वात मोठा आयातदार देश राहिलेला नसून, लवकरच जगातील प्रमुख संरक्षण निर्यातदार देश म्हणून उदयास येईल,’ असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी व्यक्त केला. देशाच्या संरक्षण सज्जतेत पूर्वीपासूनच महाराष्ट्र अग्रेसर राहिल्याचे सांगत राजनाथसिंग यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आत्मनिर्भर धोरणांचा संदर्भही दिला.

शिर्डी एमआयडीसी येथील निबे समूहाच्या संरक्षणास्त्र संकुल व तोफगोळा (आर्टिलरी शेल) उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन राजनाथसिंह यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान, उद्योगमंत्री उदय सामंत, जलसंपदा तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील, निबे समूहाचे अध्यक्ष गणेश निबे आदी उपस्थित होते.

राजनाथ सिंह म्हणाले, ‘केंद्र सरकारने संरक्षण उत्पादन क्षेत्रात धोरणात्मक सुधारणा, थेट परकीय गुंतवणुकीस प्रोत्साहन, परवाना प्रक्रियेचे सुलभीकरण आणि स्वदेशीकरणाला चालना देणारे निर्णय घेतल्यामुळे खासगी क्षेत्राचा सहभाग लक्षणीयरीत्या वाढला आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रातील खासगी उद्योगांचा वाटा आता २५ ते ३० टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, भारतीय उद्योग कोणत्याही आव्हानाला समर्थपणे सामोरे जाण्यास सक्षम आहे. भारताच्या संरक्षण उद्योगाला ऐतिहासिक परंपरा लाभली असून, महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आत्मनिर्भर लष्करी व नौदल उभारणीचा समृद्ध वारसा लाभला आहे,’ असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘भारत आता शस्त्रास्त्रांची आयात करणारा नव्हे, तर निर्यात करणारा देश बनत आहे. महाराष्ट्रातील अहिल्यानगर हे संरक्षण उत्पादनाचे नवे आणि महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येत आहे. युद्ध हे कोणालाही परवडणारे नसल्याने ते नको असेल तरीही स्वसंरक्षणासाठी आपण सज्ज राहणे महत्त्वाचे आहे. भारतात दारूगोळ्याचा अमाप साठा आहे. राज्यात नाशिक, पुणे, नागपूर आणि अहिल्यानगर येथे चार संरक्षण उद्योग समूह विकसित करण्यात येत असून, संरक्षण उत्पादनात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे,’ असेही फडणवीस म्हणाले.

या कार्यक्रमात निबे लिमिटेड आणि विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये महत्त्वपूर्ण करार करण्यात आले. ऑप्टिकल सॅटेलाइट सुविधांसाठी ‘ब्लॅकस्काय’ कंपनीसोबत भागीदारी करण्यात आली. तसेच सी-प्लेन निर्मितीसाठी कॅनेडियन कंपनी ‘हॅविलँड’सोबत आशयपत्रावर स्वाक्षरी करण्यात आली. ‘एल्बिट सिस्टीम्स’ या कंपनीलाही आशयपत्र सुपूर्द करण्यात आले. या करारांमुळे संरक्षण व अंतराळ क्षेत्रातील क्षमता बळकट होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.