विधान परिषदेची निवडणूक एकत्र लढणार

महाराष्ट्र टाइम्स

महायुती आगामी विधान परिषद निवडणूक एकत्र लढणार आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागावाटपावर चर्चा अंतिम टप्प्यात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या बैठकीनंतर जागावाटपाचा अंतिम निर्णय होईल. सर्व १७ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. जागावाटपावर ९९ टक्के एकमत झाले आहे.

विधान परिषदेची निवडणूक एकत्र लढणार
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना सात जागांसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. मात्र, शिवसेनेला भाजपने ४ जागा देण्याची तयारी केली आहे. शिवसेनेने ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर-जालना, परभणी-हिंगोली या जागांची मागणी केली आहे.

शिवसेनेने मागणी केलेल्या बहुतांश जागांवर भाजप ने एकत्रितपणे अधिक जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे शिवसेनेला ठाणे मतदारसंघ भाजपकडून देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे भाजप पुणे आणि सांगली-सातारा मतदारसंघांसाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत वाटाघाटी करीत आहे. शिवसेनेला अधिक जागा दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही तशीच मागणी केली जाईल, असे भाजपमधील काही नेत्यांचे म्हणणे आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनुकळे यांनी शनिवारी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत आगामी विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपाबाबत चर्चा करण्यात आली असून, या बैठकीत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते.

‘आगामी विधान परिषद निवडणूक भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महायुती म्हणून एकत्रितरित्या लढणार असून तिन्ही पक्षातील जागावाटपाबाबत चर्चा जवळपास पूर्ण झाली आहे. याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या बैठकीनंतर होईल’, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी दिली. तर, या १७ ही जागांवर महायुतीचा उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या बैठकीत जागावाटपाबाबत जवळपास ९९ टक्के एकमत झाले असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला. ‘काही दिवसांपूर्वीच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार आणि पक्षातील इतर नेत्यांसोबतही एक बैठक घेतली होती. या बैठकीतही जागावाटपाबाबत चर्चा झाली आहे’, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.