राज्यात सरकारच्या नावाखाली निव्वळ ‘सर्कस’

महाराष्ट्र टाइम्स

महाराष्ट्रात सरकार नावाखाली सर्कस सुरू असल्याची टीका शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी केली आहे. पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना बियाणे आणि डिझेलसाठी व्याजाने पैसे उभे करावे लागत आहेत. जालना जिल्ह्यात डिझेल विक्रीसंदर्भात काढण्यात आलेल्या आदेशावरूनही सरकारला लक्ष्य करण्यात आले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी इंधन टंचाईमुळे शेतकऱ्यांचे हाल थांबवून तत्काळ इंधनपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.

राज्यात सरकारच्या नावाखाली निव्वळ ‘सर्कस’
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

देशात आणि महाराष्ट्रात सध्या सरकारच्या नावाखाली निव्वळ ‘सर्कस’ सुरू असल्याची टीका शिवसेना (उबाठा) पक्षाचे आमदार आणि विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शनिवारी ‘एक्स’वरून केली.

पेरणीच्या तोंडावर बियाणे आणि डिझेलसाठी व्याजाने पैसे उभे करणाऱ्या शेतकऱ्यांनाच सरकार ‘साठेबाज’ ठरवत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. ‘कथित साठेबाजी होत असल्याचा सरकारचा दावा असेल, तर एकतरी साठा जप्त झाला आहे का, याचे उत्तर देण्यात यावे. साठेबाजी होत नसेल, तर पुरवठा विभाग झोपला आहे का’, असा प्रश्न दानवे त्यांनी उपस्थित केला.

जालना जिल्ह्यात डिझेल विक्रीसंदर्भात काढण्यात आलेल्या आदेशावरूनही त्यांनी सरकारला लक्ष्य केले. ‘ट्रॅक्टरची कागदपत्रे आणि नोंदणी क्रमांक दाखवल्याशिवाय कॅनमध्ये डिझेल देऊ नये, असा आदेश प्रशासनाने आहे. मग नांगरणीसाठी भाड्याने ट्रॅक्टर आणणाऱ्या गरीब शेतकऱ्यांनी डिझेल कुठून आणायचे, याचे उत्तर सरकारकडे नाही. जनतेच्या हातातील गाड्या हिरावून घेऊन त्यांच्या हातात हातगाड्या देणे, हाच या सरकारचा मास्टरस्ट्रोक दिसतोय’, असा टोला त्यांनी यावरून लगावला.

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कितीही खोटे बोलले, तरी राज्यातील चित्र इंधनटंचाईची सत्यस्थिती सांगणारे आहे. वाशिम जिल्ह्यात शनिवारी सलग नवव्या दिवशी पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत. शेतकऱ्यांचे हाल थांबवा आणि तत्काळ इंधनपुरवठा सुरळीत करा. अन्यथा, टंचाईमुळे उद्भवणाऱ्या उद्रेकाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा’, असा इशारा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी दिला.