इंधनाचा दैनंदिन साठा अहवाल द्या

महाराष्ट्र टाइम्स

पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा भासू नये यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने तेल कंपन्यांना तातडीने पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले आहेत. कंपन्यांनी दैनंदिन मागणी, पुरवठा आणि शिल्लक साठ्याचा अहवाल प्रशासनाला सादर करावा. कृत्रिम टंचाई निर्माण झाल्यास किंवा इंधन नाकारल्यास जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. मुख्य डेपो आणि पंपांवर पुरेसा राखीव साठा ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

important directive to maintain smooth fuel supply in the district

सर्व पेट्रोल पंपांची दैनंदिन मागणी, पुरवठा आणि शिल्लक साठा याचा अहवाल दररोज सायंकाळी प्रशासनास सादर करा, अशा सूचना जिल्हा पुरवठा विभागाने 'आयओसी', 'बीपीसीएल' आणि 'एचपीसीएल' कंपन्यांच्या प्रतिनिधींना पत्राद्वारे केल्या. इंधनपुरवठा तत्काळ पूर्ववत व सुरळीत करावा. कसूर झाल्यास जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा इंधन तुटवडा निर्माण होऊ नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी तत्काळ कार्यवाही करा. आपल्या कंपनीअंतर्गत येणाऱ्या सर्व पंपांना मागणीनुसार व क्षमतेनुसार पेट्रोलचा पुरवठा तत्काळ व वेळेत केला जाईल, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना या पत्राद्वारे करण्यात आली.

आगामी मागणी विचारात घेऊन मुख्य डेपोमध्ये आणि पेट्रोल पंपांवर पुरेसा राखीव साठा उपलब्ध ठेवावा. ी पेट्रोल पंपावर कृत्रिम टंचाई निर्माण करून साठेबाजी किंवा नागरिकांना इंधन नाकारले जाणार नाही, याची कंपनी प्रतिनिधींनी आपल्या स्तरावरून तपासणी करावी. जर एखाद्या पेट्रोल पंपावर साठा पूर्ण संपला असेल, तर पुढील पुरवठा कधीपर्यंत उपलब्ध होणार आहे, याची स्पष्ट वेळ दर्शवणारा फलक पंपावर लावण्याचे आदेश चालकांना द्यावेत; तसेच आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व पंपांची दैनंदिन मागणी, पुरवठा आणि शिल्लक साठा याचा अहवाल दररोज संध्याकाळी पाचपूर्वी सादर करावा. आपल्या स्तरावरून तातडीने संबंधित पेट्रोल पंपांना व पुरवठा साखळीला आवश्यक सूचना देऊन जिल्ह्यातील पेट्रोल व डिझेलचा पुरवठा तत्काळ करावा. यामध्ये कसूर झाल्यास जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी तेल कंपन्यांच्या प्रतिनिधींना पाठवलेल्या पत्राद्वारे केला आहे.