वंदे भारत एक्स्प्रेसने मुख्यमंत्र्यांचा प्रवास

महाराष्ट्र टाइम्स

पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई ते शिर्डी प्रवास वंदे भारत एक्स्प्रेसने केला. त्यांनी प्रवासात सरकारी कामांच्या फाईल्स हाताळल्या आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या कृतीतून त्यांनी जनतेसाठी उदाहरण ठेवले. यापूर्वीही त्यांनी दुचाकीवरून प्रवास केला होता आणि वाहनांच्या ताफ्यात घट केली होती.

वंदे भारत एक्स्प्रेसने मुख्यमंत्र्यांचा प्रवास
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधनबचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुंबई ते शिर्डीपर्यंतचा प्रवास ‘ वंदे भारत एक्स्प्रेस ’ने पूर्ण केला. सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देताना, प्रवासादरम्यान सरकारी कामकाज पार पाडत, मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या कृतीतून लोकांसाठी उदाहरण घालून दिले.

पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच इंधनाचा जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वत:च्या कृतीतून त्याला तत्काळ प्रतिसाद देत, मागील आठवड्यात ‘वर्षा’ निवासस्थान ते विधानभवन व मंत्रालय असा प्रवास दुचाकीवरून पार पाडला. मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या वाहनांच्या ताफ्यातही घट केली आहे. मंत्री,अधिकारी यांचे परदेश दौरे त्यांनी बंद केले आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी नियोजित असलेल्या शिर्डी दौऱ्यावर जाताना, मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसला मुख्यमंत्री फडणवीस यांनी पसंती दिली. त्यांच्या सोबत मुख्यमंत्री कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी होते.

विशेष म्हणजे, प्रवासाच्या पाच-सहा तासांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारी कामकाजाच्या विविध सरकारी फाइल हातावेगळ्या केल्या. त्यासोबतच फोनवरून विविध सरकारी अधिकाऱ्यांना कामांसबंधी सूचना दिल्या.