‘लाडकी बहीण’साठी आज अखेरची संधी

महाराष्ट्र टाइम्स

लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत आज संपत आहे. अपुरी कागदपत्रे आणि तांत्रिक अडचणींमुळे अनेक महिलांना ही प्रक्रिया पूर्ण करता आलेली नाही. यामुळे त्या योजनेतून अपात्र ठरू शकतात. ग्रामीण भागातील महिलांना अधिक अडचणी येत आहेत. निकषात न बसणाऱ्या महिलांची नावे यादीतून वगळली जातील.

ladki bhaiin scheme last chance today is important

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी देण्यात आलेली वाढीव मुदत आज, मंगळवारी (दि. ३१) संपत आहे. अपुरी कागदपत्रे, तांत्रिक अडचणी आणि प्रक्रियेतील गोंधळामुळे अनेक महिलांना अद्याप ई-केवायसी पूर्ण करता आलेली नाही. अशा लाभार्थी योजनेतून अपात्र ठरण्याची भीती आहे.

‘लाडकी बहीण’ योजनेसाठी सुरुवातीला ई-केवायसीची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत होती. मात्र, अनेक महिलांनी अर्ज भरताना शासकीय किंवा निमशासकीय सेवेत नातेवाईक असल्याचा पर्याय चुकीने निवडला होता. त्यामुळे त्या अपात्र ठरण्याची शक्यता निर्माण झाली. ही चूक दुरुस्त करण्यासाठी शासनाने ऑनलाइन ई-केवायसीमध्ये सुधारणा करण्याची संधी दिली होती. त्यानुसार मोठ्या प्रमाणावर महिलांची प्रक्रिया अपूर्ण राहिल्याने शासनाने मुदत वाढवून ३१ मार्चपर्यंत अंतिम संधी दिली.

अपूर्ण कागदपत्रे

सध्या सुमारे ३० टक्के महिलांची ई-केवायसी अपूर्ण असल्याचे महिला आणि बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. यातही विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना कागदपत्रांची पूर्तता व तांत्रिक अडचणींमुळे त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय, अपुऱ्या कागदपत्रांमुळे अनेक महिलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. निकषात बसत नसतानाही लाभ घेतलेल्या काही महिलांची नावे यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे.