‘प्रेसिडेंट कप ऑफ इंडिया’ स्पर्धेचा आजपासून थरार

महाराष्ट्र टाइम्स

प्रेसिडेंट कप ऑफ इंडिया २०२६ क्रिकेट स्पर्धेला ३१ मार्च रोजी ठाण्यात सुरुवात होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अभिनेता सलमान खान यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. देशभरातील १६ संघ यात सहभागी होतील. विजेत्या संघाला १ कोटी रुपयांचे पारितोषिक मिळेल. नवोदित खेळाडूंना संधी मिळणार आहे. प्रवेश विनामूल्य असल्याने क्रिकेट रसिकांची गर्दी अपेक्षित आहे.

‘प्रेसिडेंट कप ऑफ इंडिया’ स्पर्धेचा आजपासून थरार
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

देशभरातील टेनिस क्रिकेटपटूंना एकत्र आणणाऱ्या ‘प्रेसिडेंट कप ऑफ इंडिया २०२६’ या भव्य क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ मंगळवार, ३१ मार्च रोजी ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अभिनेता सलमान खान यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार असून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेमध्ये नगरसेवक व ठाणे महापालिकेचे अधिकारीही सहभागी होणार आहे.

३१ मार्च ते ५ एप्रिल दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत देशातील विविध राज्यांतील १६ संघ सहभागी होणार आहेत. त्यात महाराष्ट्र, दिल्ली, बिहार, गुजरात, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांचे संघ मैदानात उतरतील. या स्पर्धेतून नवोदित खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या स्पर्धेच्या एकूण बक्षिसांची रक्कम वाढवण्यात आली असून विजेत्या संघाला तब्बल १ कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडियातर्फे आयोजित या स्पर्धेसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला असून ते संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली टेनिस क्रिकेटला राष्ट्रीय स्तरावर अधिकाधिक संघटित आणि व्यावसायिक रूप देण्याचा प्रयत्न सुरु आहे. गेल्या काही वर्षात टेनिस क्रिकेट हा सर्वसामान्य तरुणांच्या सर्वाधिक पसंतीचा खेळ बनला आहे. ग्रामीण व शहरी भागातील अनेक प्रतिभावान खेळाडूंना या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची ही सुवर्णसंधी ठरणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आल्याने याठिकाणी क्रिकेट रसिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.