ठाणे शहरात पार्किंगची उग्र समस्या असून रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृतपणे वाहने उभी राहत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या समस्येवर उपाय म्हणून शहरातील पडीक मोकळ्या भूखंडांचे पार्किंग प्लाझासाठी वाटप करावे, त्यातून पालिका प्रशासनाला उत्पन्नही प्राप्त होईल, अशी सूचना कळवा येथील शिवसेनेचे नगरसेवक मंदार केणी यांनी ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पीय चर्चेत सोमवारी केली.
ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर सोमवारी चर्चा झाली. यामध्ये नगरसेवकांनी प्रभागातील समस्यांसह अर्थसंकल्पातील तरतुदींवर मत मांडले. यावेळी पार्किंगप्रश्नी नगरसेवक मंदार केणी यांनी महत्त्वपूर्ण सूचना केली. प्रत्येक प्रभागाची भौगोलिक रचना स्वतंत्र असल्याने प्रत्येक प्रभागाची घनकचरा व्यवस्थापन प्रणाली त्यानुसार तयार केल्यास ठाण्यात घनकचऱ्याची समस्या निश्चितच कमी होईल. उत्तम समन्वयासाठी पाणी, कर, प्रभाग कार्यालयांसारख्या विभागांना व करसंकलन, थकबाकी, हस्तांतरण शुल्कासाठी कर विभागाला आयजीआर विभागाशी जोडण्यात यावे, अशी मागणी केणी यांनी केली.






