शहरातील धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिराचे उद्घाटन होऊन अवघे पाच महिने उलटले असतानाच येथे तांत्रिक त्रुटींचा मुद्दा समोर आला आहे. तब्बल ३८ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या नाट्यमंदिरात नुकत्याच सादर झालेल्या ‘दमयंती दामले’ या नाटकाच्या प्रयोगादरम्यान पडदा उघडत नसल्याची आणि साउंड सिस्टीम बिघडल्याची घटना समोर आली. नाटकातील मुख्य अभिनेत्री विशाखा सुभेदार यांना घरच्या प्रेक्षकांसमोर पडदा सरकवावा लागला.
सर्कस मैदान परिसरातील स्वर्गीय आनंद दिघे नाट्यमंदिरात ६३३ आसने, वाहनतळ, अल्पोपहारगृह, कॉन्फरन्स हॉल, व्हीआयपी रूम आणि बाल्कनी अशा सुविधा उपलब्ध आहेत. सध्या या नाट्यमंदिराचे व्यवस्थापन अंबरनाथ नगरपरिषद पाहत आहे. पाच महिन्यांत अनेक नाट्यप्रयोग, विविध शाळांचे स्नेहसंमेलन, बिहार दिवस अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
शनिवारी ‘दमयंती दामले’ या नाट्यप्रयोगाच्या वेळी मध्यंतरानंतर नाट्यमंदिराचा पडदा उघडला जात नव्हता. त्यामुळे नाटकात भूमिका करणाऱ्या मूळच्या अंबरनाथकर विशाखा सुभेदार आणि अन्य कलाकारांनी हा पडदा हातांनी पुढे सरकवला. ध्वनिव्यवस्थेतही बिघाड झाल्याने कलाकारांचा चांगलाच हिरमोड झाला होता. यापूर्वी काही नाट्यप्रयोगांच्या वेळी वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे नाट्यगृहात वारंवार उद्भवणाऱ्या तांत्रिक समस्या लक्षात घेता, नाट्यप्रयोगाच्या वेळी तेथे तंत्रज्ञ उपस्थित असणे अपेक्षित होते. मात्र शनिवारी संबंधित तंत्रज्ञ उपस्थित नव्हते.





