ठाणे महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता व परिवहन कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगाचे तीन हप्ते देण्याची घोषणा महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी अर्थसंकल्पीय महासभेत केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी कर्मचाऱ्यांची देणी देण्याबाबत सूचना केल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले. ही रक्कम ठाणे महापालिका आणि परिवहन कर्मचाऱ्यांसह सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे.
ठाणे महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. परिणामी कर्मचाऱ्यांच्या वेतनात १२ ते १५ टक्यांची वाढ झाली. मात्र त्यांना मागील सहा वर्षांतील वेतन फरकाची रक्कम पाच टप्प्यात देण्यात येणार आहे. त्यातील दोन हफ्ते यापूर्वी अदा करण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम अद्याप बाकी असल्याने कर्मचारी आणि अधिकाऱ्यामध्ये नाराजी होती. याबाबत अर्थसंकल्पीय महासभेत तिसरा हप्ता कर्मचाऱ्यांसह सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना देण्याबाबतची घोषणा महापौर पिंपळोलकर यांनी केली. विशेष म्हणजे, ठाणे परिवहन सेवेमधील कर्मचाऱ्यांना त्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या रक्कमेचे तीन हफ्ते एकत्र देणार असल्याचे पत्रकार परिषदेत महापालिकेचे सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी सांगितले. यावेळी श िवसेना गटनेते पवन कदम, नगरसेवक राम रेपाळे उपस्थित होते.






