उल्लेखनीय कामगिरीसाठी नागपूर शहर व ग्रामीण पोलिस दलातील ४० पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले. पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी बुधवारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावाची यादी जाहीर केली.
महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर हे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात येते. सन्मानचिन्ह प्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये पोलिस उपायुक्तद्वय लोहित मतानी, निकेतन कदम, साहाय्यक पोलिस आयुक्त विलास शेंडे, नागपूर ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते आदींचा समावेश आहे. यासह गुन्हेशाखेच्या निरीक्षक शुभांगी देशमुख, बेलतरोडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद कवाडे, कळमना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण काळे, नंदनवनचे कैलास देशमाने, पोलिस निरीक्षक विनायक कोळी, रमेश ताले, योगेश घारे, साहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश पिंपळशेंडे, स्वप्नील बढे, सचिन टापरे आदींचाही यादीत समावेश आहे. उपराजधानीतील एवढ्या मोठ्या संख्येने पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचा दावा करण्यात येत आहे.







