वाघाचा बछड्यासहअभयारण्यामध्ये मृत्यू

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

कान्हा व्याघ्र अभयारण्यात एका वाघिणीचा तिच्या बछड्यासह मृत्यू झाला. दोघांवर उपचार सुरू होते. यंदा २७ वाघांचा मृत्यू झाला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात आय-पॅकचे संचालक विनेश चंडेल यांना जामीन मिळाला. कोलकाता-पुणे विमानाचे रायपूर येथे इमर्जन्सी लँडिंग झाले. पवन खेरा यांच्या जामीन याचिकेवर निकाल राखून ठेवला. केओंझारमध्ये मृत बहिणीचा सांगाडा बँकेत नेल्याची घटना घडली. अग्नी-६ क्षेपणास्त्राच्या चाचणीसाठी डीआरडीओ सज्ज आहे.

वाघाचा बछड्यासहअभयारण्यामध्ये मृत्यू

भोपाळ : मध्य प्रदेशातील कान्हा व्याघ्र अभयारण्यात (केटीआर) एका वाघिणीचा बछड्यासह मृत्यू झाला. ८ ते १० वर्षांची वाघीण आणि दीड वर्षांचा तिचा बछडा या दोघांनाही अभयारण्यातील एका खोलीत उपचारासाठी ठेवले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉ. संदीप अगरवाल यांनी सांगितले. यंदाच्या वर्षात आतापर्यंत २७ वाघांचा मृत्यू झाला आहे.

संचालकांना जामीन

नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले ‘आय-पॅक’ या संस्थेचे सहसंस्थापक आणि संचालक विनेश चंडेल यांना गुरुवारी जामीन मंजूर करण्यात आला. पश्चिम बंगालमधील कोळसा घोटाळा प्रकरणाशी त्यांचा संबंध असल्याचा आरोप आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चंडेल यांच्या जामीन अर्जाला विरोध केला नाही.

विमानाचे इमर्जन्सी लॅण्डिंग

रायपूर : महिला प्रवाशाला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे कोलकाता-पुणे या इंडिगोच्या विमानाचे छत्तीसगढच्या रायपूर येथील स्वामी विवेकानंद विमानतळावर इमर्जन्सी लॅण्डिंग गुरुवारी करावे लागले. विमानतळानजीकच्या रुग्णालयात महिला प्रवाशाला उपचारासाठी दाखल करण्यात आले. इंडिगोचे ६ई-१३५ हे विमान हवेत असताना महिला प्रवासी बेशुद्ध पडली होती.

खेरा यांना जामीन नाहीच

नवी दिल्ली : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांच्या पत्नीवर केलेल्या आरोपप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी केलेल्या याचिकेवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राखून ठेवला. ‘चौकशीसाठी खेरा यांना अटक करून त्यांना अपमानित करण्याची काय गरज आहे’, असा प्रश्न खेरा यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायालयास केला.

चौकशीचे आदेश

केओंझार : ओडिशाच्या केओंझार जिल्ह्यातील एका आदिवासी व्यक्तीने आपल्या मृत बहिणीच्या बँक खात्यातील पैसे काढण्यासाठी तिच्या सांगाडा पुरावा म्हणून बँकेत नेल्याच्या गंभीर घटनेची दखल प्रशासनाने घेतली आहे. या प्रकरणी ओडिशा सरकारने गुरुवारी चौकशी सुरू केली.

‘अग्नी-६’साठी सज्जता

नवी दिल्ली : ‘‘अग्नी-६’ बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणी संदर्भात सरकारची मंजुरी मिळताच ‘डीआरडीओ’कडून पुढील कार्यक्रम राबविण्यात येईल,’ असे ‘डीआरडीओ’चे अध्यक्ष समीर व्ही. कामत यांनी सांगितले. ‘एएनआय नॅशनल सिक्युरिटी समिट २.०’ मध्ये कामत यांनी ही माहिती दिली.