सन २०२५मध्ये भारताचे सागरी मत्स्य उत्पादन ३५.७ लाख टनांवर पोहोचले असून ही वाढ त्याच्या मागील वर्षाच्या तीन टक्के आहे, असे आयसीएआर- सेंट्रल मरिन फिशरीज रीसर्च इन्स्टिट्यूटने (सीएमएफआरआय) गुरुवारी जाहीर केले. सर्वाधिक सागरी मत्स्य उत्पादनात तमिळनाडूने गुजरातला मागे टाकून अव्वल स्थान पटकावले आहे. तमिळनाडूत गेल्या वर्षी ६.८५ टन मत्स्य उत्पादनाची नोंद झाली.
देशभरातील मासे उतरविण्याच्या केंद्रांवर सागरी मासेमारीतून अंदाजे ६९,२५४ कोटी रुपये उत्पन्न. त्यात १०.४५ टक्क्यांची वाढ. तर, किरकोळ बाजारपेठेत ९७,७०२ कोटी रुपयांपर्यंतचे उत्पन्न. त्यात ८.४३ टक्के वाढीची नोंद.
गुजरातवर तमिळनाडूची मात
प्रतिकूल हवामान, मासेमारीबंदीचा वाढलेला कालावधी आणि चक्रीवादळाच्या अडथळ्यामुळे गुजरातच्या मत्स्यउत्पादनात १५ टक्के घट. परिणामी, गुजरातची दुसऱ्या क्रमांकावर घसरण. केरळच्या सागरी मत्स्यउत्पादनात सन २०२४च्या तुलनेत किरकोळ दोन टक्के वाढ. ६.२४ लाख टन उत्पादनासह केरळचे तिसरे स्थान कायम.
कर्नाटक, महाराष्ट्रात वाढ
सन २०२४मधील तीव्र घसरणीनंतर कर्नाटकने यंदा मत्स्यउत्पादनात तब्बल ४४ टक्क्यांची वाढ नोंदवली. तर, महाराष्ट्रात १८ टक्क्यांची वाढ झाली.
बांगडा ठरला अव्वल
‘सीएमएफआरआय’च्या वार्षिक सागरी मत्स्यउत्पादनानुसार, देशात इंडियन मॅकरेल म्हणजेच बांगडा हा सर्वाधिक उत्पादन झालेला मासा ठरला. तब्बल २.७० लाख टन बांगडा यंदा जाळ्यात आला. सेफॅलोपॉड्स म्हणजेच माखली २.५७ लाख टन व ऑइल सार्डिन म्हणजे तारली माशाचे उत्पादन २.५३ लाख टन झाले.







