मुंबई, शनिवार : १ मे या महाराष्ट्र दिनापासून महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा मराठी ही राहील, असे राज्य सरकारने आज एका खास पत्रकान्वये जाहीर केले. मराठीला राज्यभाषेचा दर्जा देण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी १९६०च्या ऑक्टोबरमध्ये भाषा संचालनालयाची स्थापना करण्यात आली होती. त्या कार्यात प्रगती झाल्यानंतर गेल्या वर्षी ‘महाराष्ट्र अधिकृत भाषा कायदा’ संमत केला होता. या कायद्यातील चौथ्या कलमानुसार, ठरविण्यात येईल त्या दिवसापासून घटनेच्या ३४५ कलमात उद्धृत केलेल्या सर्व अधिकृत बाबींकरिता महाराष्ट्र राज्यात मराठी भाषेचा वापर करण्यात यावा. शासनाने वरील तरतुदीनुसार अधिकृत भाषा म्हणून मराठीला मान्यता दिली आहे. सहाव्या, चौथ्या कलमातील तरतुदींनुसार काही बाबी मराठीच्या उपयोगातून वगळण्यात आल्या आहेत. यांत भारत सरकारची कार्यालये, भारतीय, परदेशी वकिलाती; घटनेच्या ३४६व्या कलमात तरतूद केल्याप्रमाणे ज्या राज्य सरकारांशी हिंदीतून पत्र्यव्यवहाराचा करार झालेला नसेल, अशांशी पत्रव्यवहार करणे यांचा समावेश आहे.
(१ मे १९६६)







