‘गेल्या काही वर्षांत आपले उत्क्रांत होणे सोडा, व्यक्त होणेही बंद झाले आहे. पूर्वीचा मध्यमवर्गीय दृष्टिकोन आणखी व्यापक होत चालला आहे,’ अशी खंत प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते चंद्रकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे सल्लागार विश्वस्त लोकेश शेवडे यांच्या ‘शहाणा असशील तर लिहू नकोस...’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी कुलकर्णी बोलत होते. कुसुमाग्रज स्मारकात गुरुवारी (दि. ३०) हा कार्यक्रम झाला. राजहंस प्रकाशनाचे संपादक डॉ. सदानंद बोरसे, समीक्षक संजय भास्कर जोशी विचारमंचावर उपस्थित होते. यावेळी कुलकर्णी यांनी शेवडे यांच्याशी असलेल्या मैत्रीबंधाचे धागे उलगडताना पुस्तकावरही भाष्य केले. डॉ. बोरसे यांनी सांगितले, की उदारमतवादी विचार अंगीकारून भेदांपलीकडे माणूस म्हणून जगण्याची जाणीव शेवडे यांचे लेखांतून अधिक तीव्र होते.
संजय भास्कर जोशी म्हणाले, की हे पुस्तक वैचारिक प्रवासवर्णनासारखे असून, ते अनेक देशांच्या वैचारिक मूल्यांची सफर घडवून आणते व वाचकाला विचार करण्यास भाग पाडते. लेखक शेवडे यांनी पुस्तकामागील भूमिका विशद केली. या पुस्तकात व्यक्तिस्वातंत्र्य , इतिहास व बुद्धिप्रामाण्यवाद या तीन विषयांवर आधारित लेख आहेत, असे ते म्हणाले. मनीषा क्षेमकल्याणी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला श्रोते उपस्थित होते.
कुलकर्णी म्हणाले, की शेवडे यांना समाजातील अनेक गोष्टींविषयी राग असून, तो ते निरनिराळ्या पद्धतींनी व्यक्त करीत असतात. त्याचाच एक भाग म्हणून हे लिखाण आहे. या पुस्तकातील लेख आवडणारे नव्हे, तर अस्वस्थ करणारे आहेत. शेवडे आपल्या लेखनातून इतिहास व वर्तमान यांना एकमेकांसमोर उभे करतात व वाचकांना त्यातील अंतर्प्रवाहांची जाणीव करून देतात. या सर्व लेखांत एक सूत्र असून, ते गेल्या दहा-बारा वर्षांतील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अनेक बाबी अधोरेखित करतात.







