नागपूर : महालमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, रेशीमबागेतील स्मृतिमंदिर परिसरात रेडिएशन अटॅक (किरणोत्सर्गी मारा) करण्यात आल्याच्या धमकीचे पत्र महाल पोस्ट कार्यालयातून जीपीओत आले. त्यानंतर ते पोलिस आयुक्तालयात पोहोचले, अशी माहिती सदर पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आली आहे. गुरुवारी सदर पोलिसांच्या पथकाने जीपीओतील अधिकाऱ्यांची चौकशी केली. सदर पोलिसांसह गुन्हेशाखा पोलिसांनीही या संवेदनशील प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सोमवारी सकाळी धमकीपत्र पोलिस आयुक्त कार्यालयात आले. पत्र उघडताना त्याचा पिनकोड फाडला. त्यामुळे नेमक्या कोणत्या पोस्ट ऑफिसमधून ते जीपीओत पोहोचले, हे सध्या सांगता येत नाही. पत्र नेमके कोठून आले, ते कोणी पाठविले याचा कसून तपास सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.







