(पान एकवरून)
वाहनात कोकेनची १३६ पाकिटे आढळली. ती प्रत्येकी एक किलो वजनाची होती. क्रिकेट पॅड आणि ग्लोव्हजमध्ये लपवून ही पाकिटे ठेवण्यात आली होती. ही पाकिटे जप्त करून एकाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून भिवंडीतही कोकेन लपवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. ‘एनसीबी’च्या पथकाने भिवंडीतील लक्ष्मी कपांऊंडमध्ये तपासणी करून प्रत्येकी एक किलोची २१३ पाकिटे जप्त केली.
या अमली पदार्थ तस्करीच्या जाळ्याचे सूत्रधार, अर्थपुरवठादार आदींचा शोध ‘एनसीबी’ने सुरू केला आहे. देशात दरवर्षी सरासरी २००-३०० किलो कोकेन सापडत असताना मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आल्याने ‘एनसीबी’चे हे मोठे यश मानले जाते. गेल्या सहा महिन्यांपासून ‘एनसीबी’ने घेतलेल्या मेहनतीमुळे हे यश मिळाल्याचे मानले जाते. ‘एनसीबी’ने मुंबईत अमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय जाळे उद्ध्वस्त करून १,७४५ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले आहे. अमली पदार्थ तस्करीचे जाळे समूळ नष्ट करण्याचा आमचा निर्धार आहे, असे सांगत या मोठ्या कारवाईबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘एनसीबी’चे कौतुक केले.






