मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने गुरुवारी सांताक्रूझ येथे धडक कारवाई करत हेरॉइन विक्रीसाठी आलेल्या व्यक्तीस अटक केली. बेलाल शेख (४३) असे या व्यक्तीचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून २.५४ कोटी रुपयांचे हेरॉइन हस्तगत केले.
मुंबईत मालाड परिसरात एक जण ड्रग्जविक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शशिकांत जगदाळे यांच्या पथकाने मालाड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान येथे सापळा लावला. संशयास्पद हालचाली पाहून बेलाल याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये ५०८ ग्रॅम हेरॉइन सापडले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याने हे ड्रग्ज कुठून आणले, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.






