‘मुंबई-पुण्या’ला आता वेगवान ‘जोडणी’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई आणि पुण्याला जोडणारा नवीन द्रुतगती मार्ग सुरू झाला आहे. या मार्गामुळे दोन्ही शहरांमधील अंतर कमी झाले आहे. २३.५ मीटर रुंदीच्या बोगद्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. या प्रकल्पाची संकल्पना २०१० मध्ये आली होती, पण आता तो पूर्ण झाला आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या मार्गाचे लोकार्पण करण्यात आले.

fast connection between mumbai pune guinness record achievement

(पान एकवरून)

कोनशिलेचे अनावरण करून या रस्त्याचे लोकार्पण केले. लोकार्पणाच्या कार्यक्रमानंतर पुण्याकडील वाहिनी दुपारीच सुरू करण्यात आली, तर मुंबईकडील वाहिनी रात्री उशिरापर्यंत सुरू करण्यात आली नव्हती. त्यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंह भोसले, महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे, रोजगार हमीमंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, खासदार सुनील तटकरे व श्रीरंग बारणे, गृह अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर, सार्वजनिक बांधकाम अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर बोगद्यामधील मंडपात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात, या प्रकल्पातील २३.५ मीटर रुंदीच्या जगातील सर्वाधिक रुंदीच्या बोगद्याची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंद झाल्याबद्दल राज्य सरकार व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) अभिनंदन करण्यात आले. ‘गिनीज बुक’च्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांकडे जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र सोपवले. यावेळी ‘एमएसआरडीसी’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचा मुख्यमंत्र्यांनी प्रातिनिधिक सत्कार केला. त्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना संबोधित केले.

‘सन २०१०मध्ये या प्रकल्पाची संकल्पना आली होती. मात्र, प्रकल्पाची संरचना व अन्य काही कारणांमुळे तत्कालीन काँगेस आघाडी सरकारने तो बाद ठरवला. त्यानंतर आमचे सरकार आल्यावर मी मोपलवार व अन्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून सखोल विचार केला आणि डिसेंबर २०१५मध्ये आधीच्या सरकारचा निर्णय बदलून हा प्रकल्प राबवायचे ठरवले.

त्यावेळी एकनाथ शिंदे हे या खात्याचे मंत्री होते. प्रकल्पाच्या परिसरात वाहणारा प्रचंड जोराचा वारा आणि वैविध्य लक्षात घेऊन प्रकल्पाची संरचना करावी लागली. त्यामुळे त्यालाच दीड वर्ष लागले. शिवाय सात वेगवेगळ्या देशांतील कंपन्या व संस्थांचे विविध घटकांबाबत सहकार्य घेऊन हा प्रकल्प राबवण्यात आला. मधल्या काळात करोना संकटाचाही फटका बसला. अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थिती, दऱ्याखोऱ्यांत व जंगलात यंत्रसामग्री नेऊन काम करण्याचे आव्हान कामगार, मजुरांनी पेलले. त्यामुळे आज कामगार दिनीच या प्रकल्पाचे लोकार्पण झाले, याचाही मनस्वी आनंद आहे’, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. विशेष म्हणजे हा प्रकल्प ज्या उंबरखिंडीच्या परिसरात साकारला आहे, तिथेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी मुघलांचा पराभव केला होता, या ऐतिहासिक संदर्भाची आठवणही मुख्यमंत्र्यांनी करून दिली.

‘या प्रकल्पासाठी ज्यांचा-ज्यांचा हातभार लागला, ते प्रशंसेस पात्र आहेत. विरोधक जे होणार नाही म्हणतात, तेच आपण करून दाखवतो. प्रकल्पाच्या भूमिपूजनावेळी मी एमएसआरडीसी मंत्री होतो आणि आज लोकार्पणाच्या वेळीही हे खाते माझ्याकडेच आहे. हा एक दुर्मीळ योगायोग आहे. या द्रुतगती मार्गाची संकल्पना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मांडल्यानंतर नितीन गडकरींनी तो करून दाखवला. आता आमच्या कार्यकाळात बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात ही जोडणी सुरू होत आहे, याचा विशेष आनंद आहे’, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. तर, ‘मुंबई व पुणे या दोन शहरांतील अंतर आणखी कमी करणारा हा रस्ता राज्याच्या वेगवान प्रगतीची नांदी आहे. सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखा हा टप्पा आहे. गिनीज बुकमध्येही नोंद झाल्याने आपल्यासाठी ते अभिमानास्पद आहे. या प्रकल्पासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यासह तो मार्गी लागावा म्हणून वेळोवेळी आढावा घेतला’, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

‘प्रकल्पाच्या पाहणीच्या वेळी अजित पवार आमच्यासोबत होते आणि हा रस्ता लवकर सुरू होण्याची त्यांना आस होती’, अशी आठवण मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांनीही यावेळी सांगितली.