(पान एकवरून)
सभागृहात चर्चा होते आणि हा अर्थसंकल्प सभागृहाच्या पटलावर मांडण्यात येतो. त्यानुसार १५ एप्रिलपासून अर्थसंकल्पावर चर्चा झाली. ३० एप्रिलला शेवटच्या दिवशी अर्थसंकल्पाची उत्पन्नाची बाजू मंजूर झाली. १ एप्रिलपासून अर्थसंकल्प लागू होत असतानाच यंदा मात्र त्याला विलंब झाला. अर्थसंकल्पाच्या चर्चेच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी पक्षातील सभागृह नेते गणेश खणकर, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे आणि सर्व पक्षांचे गटनेते, समित्यांचे अध्यक्ष व सर्व नगरसेवक उपस्थित होते. यंदा प्रथमच महापालिकेच्या सभागृहाच्या कामकाजाचे 'यूट्यूब'वरून थेट प्रक्षेपण करण्यात आले. गुरुवारी शेवटच्या दिवशी सभागृहाचे कामकाज स. ११ वा. सुरू झाले आणि मध्यरात्री १ वा. संपले. गेल्या १२ दिवसांत ९४ तास अर्थसंकल्पावर चर्चा करून अनेक मुद्दे मांडण्यात आले आणि त्यानंतर शेवटच्या दिवशी महापालिका आयुक्तांनी नगरसेवकांनी मांडलेल्या मुद्यांवर थोडक्यात उत्तरेही दिली.
१८८ नगरसेवकांचा चर्चेत सहभाग
सुमारे ९४ तास चाललेल्या या चर्चेत १८८ नगरसेवकांनी आणि महानगरपालिका आयुक्तांनी भाग घेतला. महापालिकेच्या आजवरच्या ज्ञात इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने सदस्यांना सविस्तरपणे मत मांडण्याची संधी मिळाली. अर्थसंकल्पात विविध कामांकरिता केलेल्या सर्व तरतुदी १०० टक्के वापरल्या गेल्या तरच खऱ्या अर्थाने अर्थसंकल्प फलद्रुप होईल. केवळ तरतूद करणे पुरेसे नसून वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने अंमलबजावणी होणे, ही महत्त्वाची जबाबदारी असल्याचे मत महापौर रितू तावडे यांनी अर्थसंकल्पावरील आपल्या शेवटच्या भाषणातून व्यक्त केले.






