(पान एकवरून)
केंद्रात ममता रात्री १२ वाजण्याच्या सुमारास दाखल झाल्या. ‘अनेक ठिकाणच्या स्ट्राँग रूमच्या सुरक्षेबाबत तक्रारी आल्याने मी येथे तातडीने आले. मात्र, केंद्रीय यंत्रणांनी मला लगेच प्रवेश दिला नाही. मतदारांची मते ही सुरक्षित राहिलीच पाहिजेत. मतमोजणीच्या प्रक्रियेत पारदर्शकता असणे अत्यावश्यक आहे. ही प्रक्रिया ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्यास ते खपवून घेतले जाणार नाही’, असे त्या म्हणाल्या.
‘मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार अथवा उमेदवाराचा प्रतिनिधी अशा केवळ एका व्यक्तीलाच प्रवेश आहे. प्रसारमाध्यमांच्या सोयीसाठी तेथे सीसीटीव्हीचीही सुविधा स्थापित करण्याचे मी सुचवले आहे’, असे त्या म्हणाल्या. ममता बॅनर्जी तेथे पोहोचल्याचे समजताच कोलकाता पोर्टचे तृणमूलचे उमेदवार फिरहाद हकिम हेदेखील तेथे पोहोचले.
मात्र, नियमानुसार त्यांना मतमोजणी कक्षात प्रवेश देण्यात आला नाही.
कार्यकर्ते आमने-सामने
कोलकात्याच्या खुदीराम अनुशीलन केंद्राच्या बाहेर कुणाल घोष व शशी पांजा यांनी आंदोलन केले. मतमोजणी केंद्रासारख्या संवेदनशील ठिकाणी या दोघांना आंदोलन करण्याची व घोषणाबाजी करण्याची परवानगी का दिली, अशी विचारणा भाजप चे उमेदवार तपस रॉय व त्यांच्या सहकाऱ्यांनी केल्यानंतर या तणावात भर पडली. तृणमूल कार्यकर्त्यांच्या ‘जय बांगला’च्या घोषणांना भाजप कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’चे नारे देऊन प्रत्युत्तर दिले. ‘आयोगाशी संबंधित नसलेल्या बाह्य व्यक्तींचा या स्ट्राँग रूममध्ये वावर असून ते मतपत्रिकांमध्ये फेरफार करत असल्याचे सीसीटीव्हीत दिसले’, असा आरोप तृणमूलच्या उमेदवारांनी केला. मात्र, ‘या आरोपांत तथ्य नसून आमचे कर्मचारी नियमानुसार टपाली मतांची वर्गवारी करत होते’, असे आयोगातर्फे सांगण्यात आले. या गदारोळामुळे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते जवळपास रात्रभर या केंद्राच्या परिसरात उपस्थित होते.
‘मतचोरी एसआयआरमार्फत’
श्रीनगर : ‘प. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ‘एसआयआर’चा परिणाम झाल्याचे दिसून आले तर तो एक घातक पायंडा पडेल व राजकीय पक्षांना त्यापासून स्वत:चा बचाव करावा लागेल’, असे मत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शुक्रवारी व्यक्त केले. ‘मतदानानंतर ईव्हीएमच्या सुरक्षेची खबरदारी घेणे ही प्रत्येक राजकीय पक्षाची जबाबदारी आहे. पूर्वी मतपत्रिकांद्वारे मतदान होत असे तेव्हाही आम्ही मतपेट्यांच्या कक्षांबाहेर पहारा देत असू. त्यामुळे प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अशा केंद्राला भेट देऊन ईव्हीएमची सुरक्षा तपासली तर त्यात काहीच गैर नाही’, असे ते म्हणाले. ‘आजच्या काळात मतचोरी ही ईव्हीएमच्या माध्यमातून होत नसून, ती दुर्दैवाने निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ‘एसआयआर’मार्फत होत आहे’, अशी टिप्पणीही त्यांनी केली.






