(पान एकवरून)
ड्रग्ज गोळ्यांचा पुरवठादार हा महेश असल्याचे दिसून आले. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून महेश गायब झाला होता. विदेशात पळाल्याचा संशय असल्याने महेश याच्याविरुद्ध लूक आउट नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानुसार पोलंडहून परतताच महेशला विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला ६ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
विदेशातून आणून विकत असल्याचा संशय
महेश हा अनिवासी भारतीय नागरिक असून हाँगकाँग येथे त्याचे वास्तव्य आहे. मुंबईत आल्यावर तो मिरा रोड येथे राहतो. त्यामुळे विदेशातून अमली पदार्थ आणून महेश ते मुंबईत विक्री करीत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्याने आत्तापर्यंत किती ड्रग्जची विक्री केली, याबाबतही चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
महेश आणि जियामध्ये लाखोंचे व्यवहार
नेस्को प्रकरणात तपास करीत असताना पोलिसांनी ड्रग्ज विक्रीचे आर्थिक व्यवहार तपासले. यामध्ये मुलांनी घेतलेल्या गोळ्यांचे पैसे अभिनय क्षेत्रात नशीब आजमावू पाहणाऱ्या जिया जेकब हिच्याकडे पाठविल्याचे समोर आले. पुढील आर्थिक व्यवहारांमध्ये जिया आणि महेश यांच्यात लाखो रुपयांचे आर्थिक व्यवहार सापडले. आत्तापर्यंतच्या तपासामध्ये सुमारे ५० लाख रुपयांचे व्यवहार दोघांमध्ये झाल्याचे तपासातून उघड झाले आहे.






