कोलकाता : ‘मतमोजणी केंद्रांवर कोणत्याही गैरप्रकारांना बिलकूल वाव नाही’, असा निर्वाळा मुख्य निवडणूक अधिकारी मनोज अगरवाल यांनी शुक्रवारी दिला. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसेच, तृणमूलच्या उमेदवारांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. ‘राज्यातील सर्व स्ट्राँग रूमना कडक सुरक्षा पुरवण्यात आली आहे. तसेच, हे सर्व कक्ष अहोरात्र सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आहेत. या केंद्रांमध्ये फेरफार होत असल्याचे आरोप निराधार आहेत. या केंद्रांमध्ये कोणीही कोणत्याही प्रकारे चुकीचे कृत्य करू शकत नाही. याबाबत जी मंडळी आरोप करत आहेत त्यांनी त्याविषयी पुरावे द्यायला पाहिजेत’, असे ते म्हणाले.






