भारताच्या आर्थिक परिवर्तनात महाराष्ट्राने नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. उद्योगापासून नवोन्मेषापर्यंत, वित्तपुरवठा ते उत्पादनापर्यंत, वाणिज्यपासून ते सर्जनशीलतेपर्यंत भारताच्या प्रगतीत महाराष्ट्राचे योगदान अतुलनीय आहे. महाराष्ट्र हे गुंतणवणूकदारांसाठी कायम पहिल्या पसंतीचे ठिकाण राहिले आहे. २०४७ पर्यंत विकसित भारत साकार करण्याच्या स्वप्नात विकसित महाराष्ट्राची संकल्पना आपण उत्तमरित्या जोडलेली आहे. विकसित आणि आत्मनिर्भर भारत बनविण्याच्या आपल्या प्रवासात महाराष्ट्राची भूमिका निर्णायक असेल’, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा गौरव केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराचेही पंतप्रधानांनी कौतुक केले. महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधत पंतप्रधानांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठीतून एक खास पत्र लिहिले आहे. महाराष्ट्रातील नागरिकांना यात महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराजांसह महाराष्ट्रातील सर्व पूजनीय व्यक्तींना नमन करत महाराष्ट्राला सर्वतोपरी पाठबळ देण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचेही यात म्हटले आहे. या शुभेच्छांबद्दल राज्यातील सर्व नागरिकांच्या वतीने मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.


